भुसावळ व यावल आगाराच्या दोन बसेस मार्गावरच नादुरूस्त; प्रवाशांना रस्त्यावरच बसावे लागले ताटकळत
भुसावळ (प्रतिनिधी)- सुरक्षीत प्रवासाची हमी देणार्या राज्य परीवहन महामंडळाच्या आगारात बसेस दुरूस्तीसाठी आवश्यक असलेल्या स्पेअर पार्टस्चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे बसेस जीर्णावस्थेतील स्पेअर पार्टसवरच मार्गावर धावत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देवून विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे मात्र परीवहन महामंडळाकडूनच प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे प्रकार समोर येत असल्याने बसचा सुरक्षित प्रवास कसा करावा? असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला आहे. महामंडळाच्या आगारात बसेस दुरूस्तीकरीता लागणार्या नवीन स्पेअर पार्टस्चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे चालकांना जीर्णावस्थेत आलेल्या स्पेअर पार्टस्वरच बससह प्रवाशांना घेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. परीणामी धावत्या बसेसचे पार्टस मार्गावरच निखळून पडत असल्याने बस नादुरूस्तीच्या प्रकारात वाढ झाली आहे. शिवाय, बस मार्गावरच नादुरूस्त होत असल्याने चालक व वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
सतर्कतेमुळे बचावले प्रवासी
गुरूवारी अशाच प्रकारे सकाळी सात वाजेदरम्यान भुसावळ-रावेर बस (क्र.एम.एच.40-एन.9022) या धावत्या बसचे शहरातील तापी नदी पुलाच्या अलीकडे मागील चाकाचा स्प्रिंग पाटा तुटून पडला. हा प्रकार बस चालकाच्या लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून होणारा अपघात टाळल्याने बसमधील प्रवाशी सुखरूप बचावले तर यावल भुसावळ यावल बस ( एम.एच.14 बी.टी.2204) च्या इंधन टाकीतून इंधन व इंजिनमधील ऑईलची गळती होत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यामुळे चालकावर तापीनदीच्या पलीकडे बस थांबवून प्रवाशांना दुसर्या बसने पुढील प्रवासाला रवाना करण्याची वेळ आली.
नादुरूस्तीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
पावसाळ्यात शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होतात. परीणामी बस चालकांना जीर्णावस्थेतील पार्टस्वरच बस घेवून मार्गक्रमण करावे लागणार असल्याने बसच्या नादुरूस्तीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास निघालेल्या भुसावळ रावेर या बसचे मागील स्प्रिंग पाटा तुटल्याचे लक्षात येताच चालकांने बसवर नियत्रंण मिळवले. यामूळे होणारा अपघात टाळल्याने चालक अविनाश पाटील व वाहक वाय.पी.सोनवणे यांचे प्रवाशांनी कौतुक केले.