भुसावळ स्थानकावरील घटना ; तक्रारदाराच्या रेट्यानंतर अखेर लोहमार्ग पोलिसांनी केला गुन्हा दाखल
भुसावळ- स्पेशल स्कॉडमध्ये तिकीट निरीक्षक असल्याचे सांगून बर्हाणपूरच्या प्रवाशाला तब्बल 40 हजारात गंडवण्यात आल्याची घटना भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर 28 नोव्हेंबर रोजी घडली. तक्रारदाराने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तोतया आरोपीविरुद्ध 8 रोजी गुन्हा दाखल केला.
बर्हाणपूरच्या प्रवाशाला 40 हजारात गंडवले
बर्हाणपूर येथील शौकतखा ईदायत खॉ (61, मोमीनपुरा, बर्हाणपूर) हे आपल्या जावयासह अप 11058 पठाणकोट एक्स्प्रेसने 28 रोजी मुंबई जात असताना भुसावळ स्थानकावर रात्री 8.45 वाजता गाडी आल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक तीनवर ते नास्ता घेण्यासाठी उतरले यावेळी डोक्यात मंकी कॅप घातलेला व अंगात पांढरा शर्ट व काळी पँट घातलेल्या 30 वर्षीय अनोळखी ईसमाने आपल्या स्पेशल कॉडमधील तिकीट निरीक्षक असल्याचे सांगून शौकतखा यांना बॅगेत काय असल्याचे सांगून साईडला नेत त्यांच्या बॅगेतील 40 हजारांची रोकड काढून घेतली व प्रवाशाचा हात धरत बोगी क्रमांक एस- 5 जवळ आणून सोडले. प्रवाशादेखत बॅगेत रोकड टाकत असल्याचे भासवत बॅगेला चैन लावून आता मागे वळून पाहू नको, असे सांगत प्रवाशाला डब्यात बसण्यास सांगितले. शौकतखा हे डब्यात बसल्यानंतर त्यांनी बॅग तपासली असता रोकड नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
लोहमार्ग पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
तक्रारदाराने झालेली घटना लोहमार्ग पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी लागलीच दखल घेतली असतीतर तोतया आरोपी लागलीच जाळ्यात अडकला असता मात्र पोलिसांनी वेळ मारून नेत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली अखेर तक्रारदाराने दबाव वाढवल्यानंतर 8 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीचा शोध घेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तपास पोलिस दिलीप गढरी करीत आहेत.