‘स्पेशल 26’ टोळी जेरबंद

0

कोल्हापूर : स्पेशल 26 हा चित्रपट सर्वांनाच परिचित आहे. आपण सीबीआयचे अधिकारी असून ओम्ही तुमच्या घरी छापा टाकायला आल्याचे सांगून घरातील सर्व ऐवज लुटून नेण्याची या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटातील टोळीनुसार एका टोळीला सध्या कोल्हापूर पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीच्या फिल्मी स्टाईल चोरीने पोलिसही आचंबित झाले आहेत.

शहरातील वाढत्या चोर्‍या रोखताना पोलिसांच्या हाती दरोडे टाकणारी टोळी लागली आहे. या टोळीचा म्होरक्या आहे वडणगेतील गणेश बळवंत पाटील. पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करणार्‍या पाटीलने स्वतःचे बनावट ओळखपत्र बनवले आहे. त्याच्याकडे खाकी युनिफॉर्म आणि पोलिस अधिकार्‍यांची काठीही (केन) आहे. याची ठाण्यातील सुरेंद्र जैसवाल याच्याशी मैत्री झाली. यानंतर दोघांनी टोळी तयार करून लोकांना गंडा घालण्याचा उद्योग सुरू केला.

राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये या टोळीने दरोडे टाकले आहेत. काहीच हाती लागले नाही तर, घरफोड्या आणि चोर्‍या करण्यातही ही टोळी माहीर आहे. कोल्हापूर शहरात ही टोळी दाखल झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वडणगेतील एका सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला पोलिसांनी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वडणगे फाटा येथे सापळा रचून पकडले. गणेश पाटील (वय 44, रा. वडणगे) याच्यासह सुधीर रायप्पा येनोळगे (56, रा. मोरेवाडी, ता. करवीर), संजयकुमार रामजी शर्मा (40, रा. फतेहपूर, जि. महू, उत्तरप्रदेश), सुरेंद्र बनारसी जैसवाल (37, रा. निराबाई आपार्टमेंट, ठाणे पश्चिम, हरिष रामसाहाज शर्मा (25, रा. कळवा, ठाणे, मूळ रा. उत्तरप्रदेश), वासूराम रामदवर जैसवार (43, रा. ठाणे पश्चिम), हवालदार तपसी सरोज (44, रा. कांदिवली पूर्व, मुंबई) आणि शशिकुमार रामजी शर्मा (31, उत्तरप्रदेश) हे आठ संशयित पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी यांच्याकडून दोन पिस्टल, एक एअरगन, तलवारी, चाकू, बनावट सोने, बनावट नोटा यासह दोन तवेरा कार जप्त केल्या आहेत. या टोळीने चाळीसहून अधिक ठिकाणी चोर्‍या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, याचा तपास सुरू आहे.