स्पोर्टस् पारितोषिकांची संख्या वाढली : राजेंद्र घाडगे

0

विशेष प्राविण्य मिळविलेल्यांचा सत्कार

आकुर्डी : महाविद्यालयांमध्ये स्पोर्टस मधील पारितोषिकांची संख्या वाढलेली दिसते. त्याचा आपल्याला आनंद मोठा आहे. अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून गेली काही वर्षे बालेवाडी येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. या कार्यक्रमाचे हे फलित आहे. खेळाडूंचा सत्कार करताना खूप आनंद झाला आहे. ऑल्मिपिकसाठी विद्यार्थ्यांना जाता यावे, यासाठी कुस्तीपटू दत्तक घ्यावा असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केले. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे, या उद्देषाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री रिध्दी मायनेकर, सह निर्माता गणेश गुरव, अभिनेता रमेश साठे, अभिनेता यश पिल्ले, भारतश्री योगेश जाधव आदी उपस्थित होते. तसेच मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डी. पी. चिमटे, रजिस्ट्रार अनिल शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी रेश्मा मकरंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. चासकर म्हणाले की, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सत्कार केला जातो. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करणे क्रमप्राप्त असून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास विद्यार्थ्यांना यश मिळेल. ते पुढे जातील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कलाक्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रिध्दी मायनेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली. कला क्षेत्रात करण्यासारखे खूप काही असून विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला दिला. यश पिल्ले म्हणाले की, मी रॅप, मिमिक्री करत असतो. तसेच विविध सिरियलमध्ये काम करीत आहोत. अभिनेता रमेश साठे यांनी कॉलेज कट्टा या विषयी आपले मत कवितेच्या माध्यमातून मांडले. कवितेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केले.

सर्वांसाठी महत्वाचा कार्यक्रम
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड. संदीप कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्याचे महत्त्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांची माहिती देउन त्यातून विद्यार्थ्यांना खेळासाठी मार्गदर्शन दिले जाते, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. महाविद्यालयामध्ये वर्षभर झालेल्या कार्यक्रमांचे वाचन शारिरीक शिक्षण संचालक प्रा. डी. पी. चिमटे यांनी केले. महाविद्यालयामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापकांचे सत्कार करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. नुतन डुंबरे व प्रा. रामदास लाड यांनी केले. तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी केले.