स्मशानभूमीत अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका

0

पिंपरी-इंद्रायणी नदीचे पाणी वाढल्याने मोई येथील इंद्रायणीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत अडकलेल्या वृद्ध दांपत्याची अग्निशमन विभागाने सुटका केली. ही कामगिरी अग्निशमन विभागाने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास केली. राम लखन शर्मन (वय 75) आणि मालन राम शर्मन (वय 70, दोघेही रा. नवी स्मशानभूमी, मोई) अशी सुटका करण्यात आलेल्या वृद्ध दांपत्याचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच नद्यांना पूर आल्याचे चित्र दिसत आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मोई मधील स्मशानभूमीमध्ये एक वृद्ध दांपत्य राहत आहे. नदीचे पाणी वाढल्याने स्मशानभूमी पाण्यात बुडाली. यामध्ये शर्मन दांपत्य देखील या पाण्यात अडकले. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच, पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन बंब आणि एक बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले. पथकाने या वृद्ध दांपत्याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.