मंजूर निधीत घोटाळा केल्याचे माहिती अधिकारातून झाले उघड; विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काजळे यांनी केली तक्रार
वडगाव मावळः मावळ तालुक्यातील असलेल्या अहिरवडे गावातील स्मशानभूमीच्या बांधकामासाठी आलेला निधी हडप करण्यात आला आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकार्यांनी यावर डल्ला मारला असून त्यामुळे या गावामध्ये अंत्यसंस्कार उघड्यावर करावे लागत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काजळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने 18 जून रोजी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यात अर्धवट जळतात
तीन वर्षांपूर्वी मावळ भागातील अहिरवडे गावातील स्मशानभूमी बांधकामासाठी कामासाठी पुणे जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून 5 लाख 60 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी बांधकामसाठी न वापरता हा निधी सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकार्यांच्या खिशात गेला आहे. मावळ तालुक्यातील चिखलसे-अहिरवडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत अहिरवडे गावाला गेल्या अनेक वर्षांपासून अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने अहिरवडे रस्त्यालगत असलेल्या खापरे ओढा परिसरात उघड्यावर अंत्यविधी केले जात आहेत. पावसाळ्यात अनेकदा मृतांचा अंत्यविधी करताना अचानक पाऊस आल्याने जळत असलेली मृतदेह विजून अर्धवट मृतदेह
जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच उघड्यावर अंत्यविधी करत असल्याने पावसाळ्यात मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
अधिकार्यांनी केली रक्कम हडप
अहिरवडे गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून 19 जुलै 2014 रोजी पाच लाख 60 हजार रुपयांचा निधी चिखलसे-अहिरवडे ग्रामपंचायत खात्यावर जमा झाला होता. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकार्यांनी संगनमताने स्मशानभूमीचा निधी स्मशानभूमी बांधकामासाठी 8 एप्रिल 2015 मध्ये ठेकेदार यांना एक लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काजळे यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळवली आहे. त्यात स्मशानभूमी बांधकामासाठी आलेला निधी मावळ पंचायत समितीने 23 फेब्रुवारी 2015 रोजी एक लाख 76 हजार रुपये, 31 मार्च 2015 रोजी दोन लाख 46 हजार रुपये, 31 मार्च 2016 ला एक लाख 38 हजार रुपये अशी एकूण पाच लाख 60 हजार रुपये चिखलसे-अहिरवडे ग्रुप ग्रामपंचायत खात्यावर जमा झालेत. या कालावधीतील सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकार्यांनी ही रक्कम हडप केली आहे.