पुणे । शहरातील विविध रस्त्यावर आणि चौकांमध्ये भिकार्यांचे रॅकेट चालविले जात आहे. गाड्यांमधून भिकार्यांना विविध चौकात आणून सोडले जाते, वेळ संपल्यानंतर पुन्हा गाड्यामधून त्यांना नेले जाते. लहान मुलांना चिमटे घेऊन रडविले जाते. ही मुले नेमकी कोणाची आहेत, याचा सखोल तपास केला जावा. भिकारी ही स्मार्ट सिटीला लागलेली सामाजिक कीड आहे. शहर भिकारीमुक्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. शिवसेनेचे नगरसेवक अॅड. अविनाश साळवे यांनी शहरातील भिकार्यांच्या रॅकेटवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, शहरातील विविध रस्ते आणि चौकात भिकार्यांचे रॅकेट चालविले जाते आहे. हे काम घड्याळाचा काटा पाहून सुरू आणि बंद केले जाते. चौकाचौकात भिकार्यांना कारमधून आणून सोडले आणि नेले जाते. या भिकार्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला जातो. यामागे कोण आहे, याचा तपास प्रशासनाने लावणे गरजेचे आहे.
भीक मागणार्या मुलांचे पुर्नवसन
घरटे प्रकल्पामध्ये रस्त्यावरच्या मुलांचा समावेश आहे का असा प्रश्न उपस्थित करत मुलांची संख्या किती आहे, हेच प्रशासनास माहीत नसल्याचे राजश्री काळे यांनी सभागृहास सांगितले. पोलिसांनी पकडलेले भिकारी 25 हजाराचा जामीन घेऊन बाहेर आल्याचे गफुर पठाण यांनी सांगितले. यावर स्पष्टीकरण देताना पालिका सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या की, भीक मागणार्या मुलांचे पुर्नवसन केले जाणार आहे. त्यांचा शालाबाह्य मुलांमध्ये समावेश करून त्यांच्यासाठी जुन्या शाळांमध्ये वसतिगृह तयार केली जाणार आहेत. घरटे सारख्या संस्थांचे थकीत पैसे दहा दिवसात देण्याचे आश्वासन दिले.