निगडी (प्रतिनिधी) – येथील आयआयसीएमआर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2018 या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. या स्पर्धा नुकत्याच संपूर्ण भारतात पार पडल्या. या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराची मान शैक्षणिक क्षेत्रात आणखी उंचावली आहे. हैद्राबाद येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयआयसीएमआर संस्थेच्या एमसीए विभागाचे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले. त्यातील एका संघाने तब्बल 36 तास संगणकावर कोडिंग कडून स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला. ट्रॉफी आणि 25 हजार रुपयांचा धनादेश असे बक्षिसाचे स्वरूप होते. या स्पर्धेचे आयोजन एमएचआरडी, एआयसीटी, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, एनआयसी, सिस्को, देवनेट डेलॉइट केपीआयटी, माय जीओव्ही आदींनी केले होते.
आयआयसीएमआरच्या विद्यार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पासाठी अतिशय फायदेशीर ठरणारे सॉफ्टवेअर तयार केले. या सॉफ्टवेअरचा फायदा सरकारी अधिकारी आणि नागरिक असा दोघांना होणार आहे. स्पर्धेत एमसीएच्या प्रथम वर्षातील किशोर त्रिमल, श्रुतिका कडवे, राहुल रवींद्रन, राकेश घोटायल, आशिष गोरे, दीपाली भंडारे, मेंटॉर अमित अगरवाल आदींनी सहभाग घेतला. आयआयसीएमआरच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.