स्मार्ट जमान्यात ‘क्विक रिस्पॉन्स’ तंत्रज्ञान नेटीझन्ससाठी वरदान!

0

1994 मध्ये जपानी कंपनीने ‘क्विक रिस्पॉन्स’ तंत्रज्ञान जन्माला घातलं. त्यालाच क्यूआर कोड म्हणतात. हे तंत्रज्ञान कमी कालावधीतच लोकप्रिय झाले. उपलब्ध असणार्‍या टू डायमेन्शनल बारकोड्सपैकी हा सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. एवढेच नाही तर अमेरिकेत असणार्‍या बारकोड्सपेक्षाही जलद गतीने काम करू शकणारा हा कोड आहे. या कोडमध्ये समाविष्ट केलेली माहिती किंवा डेटा डाऊनलोड होण्याचा वेग सर्वाधिक असल्यामुळेच क्यूआर कोडचा वापर मोठा आहे. टूडायमेन्शनल बारकोडमध्ये अनेक इतर कोड्स उपलब्ध आहेत. सुपरमार्केटमध्ये मग डीमार्ट असो किंवा स्टार बाजार तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये स्टॅण्डर्ड बारकोडचा वापर केला जातो. क्यूआर कोड प्रथम ऑटोमोबाईल पार्ट्सना ट्रॅक करण्यासाठी वापरले जात होते.

त्यांचा वापर हा तेवढ्यापुरताच मर्यादित होता. परंतु, जसजशी या कोडची उपयुक्तता पुढे येऊ लागली तसतसा त्याचा वापर आणि वावर इतर क्षेत्रांमध्येही होऊ लागला. आजच्या घडीला जगभरात आणि विशेषत: चीन, जपान, द. कोरियासारख्या पूर्व आशियाई देशांमध्ये क्यूआर कोडचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. परिणामी कीपॅडवर टाईप करण्याचा वेळ वाचल्यामुळे नेटीझन्सच्या कामाचा वेग अधिक वाढला आहे. थोडक्यात‘स्मार्ट जमान्यात’ ‘क्विक रिस्पॉन्स’ तंत्रज्ञान नेटीझन्ससाठी वरदान ठरत आहे. आमचे सहकारी तसेच डिजिटल विभागात कार्यरत असलेले तुषार भामरे यांच्याशी क्यूआर कोडच्या वापराविषयी व उपयोगाविषयी चर्चा केली. यामधून क्यूआर कोड निर्मितीपासून ते डिजिटायझेनपर्यंत याचा कसा उपयोग होतो, याची इत्थंभूत माहिती त्यांनी दिली. त्यांच्याशी चर्चेतून अनेक मुद्दे समजले. जसे की, आपल्याकडे जसं व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय आहे तसे चीनमध्ये अनेक अ‍ॅपपैकी लोकप्रिय असणारे अ‍ॅप म्हणजे वी- चॅट. स्मार्टफोनमध्ये वी-चॅट नाही असा चिनी सापडणं दुर्मिळच. चॅटिंग, गप्पा मारणे, मूमेण्ट्स शेअर करणे (फेसबुकची जशी टाइमलाइन असते साच हा प्रकार असतो) या व्यतिरिक्तही वी-चॅटचा वापर तिथे मोठ्या प्रमाणावर होतो. आपल्याकडे सध्या पेटीएमसारख्या सुविधा जोमात आहेत. अ‍ॅप सुरू करायचं आणि दुकानातल्या त्या चौकोनी काळ्या आकृतीसमोर मोबाईल धरायचा. ती आकृती स्कॅन झाली की थेट त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करता येतात. सांगायचा मुद्दा हा की ती जी आकृती स्कॅन होते तिला क्यू-आर कोड असे म्हणतात.

चीनमध्ये हाच प्रकार वी-चॅटच्या माध्यमातूनही केला जातो. अर्थात पेटीएमसारखे अ‍ॅप्सतिथेही आहेत. पण सोशल मीडिया अ‍ॅपचा प्रभावी वापर करण्यात चीन आपल्या पुढे आहे हे मान्य करावे लागेल. क्यूआर कोडचा वापर करण्यासाठी मुख्यत: स्कॅनरची आवश्यकता असते. चिनी बनावटीच्या स्मार्टफोन्समध्ये क्यूआर कोड स्कॅनरचे अ‍ॅप आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते. इतर काही मोबाइल्समध्येही हे अ‍ॅप बाय डिफॉल्ट असते. अन्यथा अ‍ॅप्लिकेशन स्टोअरमध्ये ढिगाने अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ‘क्यूआर कोड स्कॅनर’ असे टाईप केल्यास अनेक स्कॅनर अ‍ॅप्स उपलब्ध होतात. क्यूआर कोड आणि स्कॅनर यांचं काम रंजक आहे. सर्वप्रथम फोनमधलं अ‍ॅप सुरू करायचं आणि स्कॅनर सुरू झाला की कोडसमोर धरायचा की झालं काम. या क्यूआर कोडला टेक्स्ट किंवा न्यूमरिकमध्ये मोबाइल परिवर्तित करतो. अ‍ॅप्लिकेशन या कोडचे पृथ:करण करते आणि त्यानुसार वेबसाइटची लिंक, टेक्स्ट, इमेज किंवा व्हिडीओ थेट सुरू करते. सामान्यत: वेबसाइटची लिंक टाइप करून मग ती उघडावी लागते. मात्र तो सगळा वेळ या ‘क्यूआर कोड स्कॅनर’मुळे वाचतो. आपल्या फेसबुक प्रोफाइलचा, व्हिजिटिंग कार्डचा, वेबसाइटचा किंवा ईमेल आयडीचाही क्यूआर कोड बनवता येतो. त्यामुळे व्हिजिटिंग कार्डवर हा कोड छापता येतो. जेणेकरून ज्यांना वेबसाइट किंवा ईमेल आयडी टाइप करण्याचा कंटाळा येतो ते याचा वापर तर करतीलच परंतु, ज्यांना एकमेकांच्या संपर्कात राहायचं आहे त्यांचा वेळही वाचतो. अर्थात क्यूआर कोड तयार करणे आता काही कठीण नाही. गुगलवर क्यूआर कोड जनरेटर असा सर्च दिला की असंख्य लिंक्स उपलब्ध होतात. क्यूआर कोड नरेटर डॉट. कॉम ही सर्वात सोपी वेबसाइट आहे. वेबसाइट, व्हिजिटिंग कार्ड, टेक्स्ट,ईमेल, एमपीथ्री, अ‍ॅप, इमेज यासाठी इथे काही मिनिटांत क्यूआर कोड तयार होतो.

क्यूआर कोड हा काळा आणि पांढर्‍या चौरसांचा मिळून बनलेला असतो. प्रत्येक चौरसाला तांत्रिक भाषेत मोड्यूल म्हणतात. क्यूआर कोडला चौरसाच्या तीन कोपर्‍यांमध्ये मोठे काळे चौरस असतात. स्कॅनरला कोडच्या कडा कळाव्यात यासाठी हे चौरस असतात. आणि एक छोटा चौरस उजवीकडच्या कोपर्‍याच्या वर असतो. हा चौरस म्हणजे स्कॅनरसाठी रेफरन्स पॉइंट असतो. तीन मोठ्या चौरसांना लागूनच एक चौरसाची छोटी कड असते. ही कड कोडमध्ये वेबसाइटची लिंक आहे, टेक्स्ट मेसेज आहे की अन्य काही आहे हे स्कॅनरला सांगते.

– सुनील आढाव