स्मार्ट डिजीटल फलकावरील खळखट्याकमुळे 37 लाखांचे नुकसान

0

पुणे : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागांत उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून 37 लाखांचे नुकसान केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये नागरिकांना विविध स्वरुपाची माहिती देण्यासाठी डिजिटल फलक बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे फलक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत मनसेने या फलकांना लक्ष्य केले. या तोडफोडीत तब्बल 37 लाखांहून अधिक रुपयांना फटका बसल्याचा अंदाज असून नुकसानाची मोजणी अद्याप सुरू आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाणे तसेच डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून त्यासोबत डिजिटल फलक काढण्यासंदर्भात संबंधित पक्षाने दिलेले पत्रही जोडण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.