पुणे : सुसंस्कृत आणि देखणे पुणे शहर कुरूप करणार्या बेकायदा फ्लेक्सबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात सध्या मोबाईल कंपन्यांनी फुकट फ्लेक्सबाजी चालवली असून, या प्रकरणी महापालिकेनेही सर्रास दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. ओप्पो आणि विवो या दोन विदेशी मोबाईल कंपन्यांचे शहरात शेकडो फ्लेक्स झळकले असून, ते पूर्णपणे अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे महापालिकेचे लाखो रूपयांचे उत्पन्न बुडाले असून, याप्रकरणी कोणावर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेकडे या फ्लेक्सबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी नसल्याने या कंपन्यांनी कोणाच्या आशीर्वादाने ही फ्लेक्सबाजी केली असा प्रश्न निर्माण होत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, किमान 40 हजारांपेक्षा जास्त फ्लेक्स या कंपन्यांनी शहरात लावले असावेत, असा अंदाज आहे.
माहिती अधिकारातून बाब उघड
सर्वसामान्य पुणेकराने कर थकवल्यास थकीत रकमेवर व्याज आणि दंड आकारण्याची पद्धती महापालिका राबवते. मात्र शहराचे रुपडे बिघडवणार्या बेकायदा फ्लेक्सबाजीला महापालिकेने जागा आंदण दिल्यासारखी स्थिती शहरात आहे. सध्या ओप्पो आणि विवो या दोन विदेशी मोबाईल कंपन्यांच्या जाहिराती शहरभर झळकत असताना महापालिका अधिकार्यांनी त्याकडे मुद्दाम कानाडोळा करून आपले अर्थकारण साधल्याचे आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सूरज लोखंडे यांनी केला आहे. सूरज लोखंडे यांनी माहितीच्या अधिकारातून या दोन कंपन्यांनी कोणकोणत्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज करून फलक लावण्यासाठी परवानगी मागितली होती अशी विचारणा करणारे पत्र महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यावर शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांनी या कंपन्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोनच कंपन्यांना एवढे अभय कशासाठी देण्यात येते, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
महापालिकेला कोट्यवधींचा चुना
महापालिकेतर्फे अधिकृत फलकांवर जाहिरात करायची असल्यास 222 रुपये प्रति स्केअर फूट प्रति वर्ष असा दर आकारला जातो. सध्या या दोन कंपन्यांनी किमान 40 हजारांपेक्षा जास्त फ्लेक्स शहरभर लावल्याची चर्चा शहरवासीयांत होत असून, त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने महापालिकेला कोट्यवधींचा चुना लागला आहे.