कचरा आणि नाला ही मुंबईची प्रमुख समस्या असल्याचे राष्ट्रावादीचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत सांगितले. साफसफाई न झाल्याने लोकं मरताहेत असे सांगताना त्यांनी स्मार्ट सिटीच्या योजनेवर हल्लाबोल केला. स्मार्ट सिटी करतोय आणि शौचाची सोय नाही, असे एकदम गावरान शब्द वापरून त्यांनी सांगताच, सभागृहात एकच हशा पिकला. हजार माणसे आणि 2 संडास हा कुठला न्याय आहे? असा सवाल त्यांनी केला. संडाससाठी लोकांना कॅज्युअल सुट्टी टाकावी लागेल. लोकांना माजबुरीने बाहेर बसण्याची वेळ का येते हे पहा? असे सांगत त्यांचे फोटो काढण्यासाठी सरकार धावतेय असे आव्हाड म्हणाले. फोटो काढून अपमानित करू नका, लोकं आत्महत्या करतील असे भावनिक आव्हान आव्हाडांनी केले. स्मार्ट सिटी करायचीय तर दोन दिवस झोपडपट्टीत राहून स्मार्ट सिटीचा अनुभव घ्या असा सल्लाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना यावेळी दिला. 5 स्टार मध्ये बसणाऱ्याला हे समजणार नाही असे म्हणत त्यांनी टोमणा मारला.
खड्ड्यांवरून ‘गोल-गोल’ थांबेना
नागरी क्षेत्रातील समस्यांवर आणि डबघाईला आलेल्या स्थितीवर विधानसभेत जवळपास पाच तास चर्चा झाली. यामध्ये मुंबई महानगरपालिका केंद्रस्थानी राहिली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य, साफसफाई, नाले, शौचालय, पाणी आणि अशा अनेक घटनांवर यावेळी चर्चा झाली. मात्र यावेळी केंद्रस्थानी राहिले ते मुंबईचे खड्डेमय झालेले रस्ते. यामुळे अगदी पृथ्वीराज बाबांसारख्या अनुभवी सदस्यांपासून ते अनेक ज्युनियर सदस्यांनी मालिष्काच्या ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय’, ‘खड्डे किती गोल-गोल’, ‘खड्ड्यात झालाय झोल-झोल’ या शब्दांचा उल्लेख केलाच. यावरून सेनेच्या उपस्थित मंत्र्यांवर आणि सदस्यांवर टोमणे मारण्याचा चान्स सदस्यांनी सोडला नाही.
कन्यांचा केला सन्मान
आजच्या कामकाजात भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या तीन रणरागिणी पूनम गायकवाड, स्मृती मानधना, मोना मेश्राम यांचा विशेष सन्मान सभागृहात केला गेला. यावेळी तिघीही उपस्थित होत्या. तिन्ही कन्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मांडला. यावेळी त्यांनी तिघींना प्रत्येकी 50 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली.देशाची मान उंचावनाऱ्या या कन्यांचे बाक वाजवून कौतुक करण्यात आले. यावेळी सभागृह दणाणून गेले.
– निलेश झालटे