‘स्मार्ट’ विकासासाठी नेमला सल्लागार

0

पिंपरी-चिंचवड : एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन होणार आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा बनविण्याचे काम त्यांच्याकडे दिले आहे. कायदेतज्ज्ञ, भू-मापक, वास्तुविशारद, अभियंते, आरोग्य तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिका आयुक्तांच्या दालनात स्मार्ट सिटी संचालकांची शुक्रवारी दुसरी बैठक पार पडली.

विषयपत्रिकेवर 10 विषय
स्मार्ट सिटीच्या विषयपत्रिकेवर 10 विषय होते. त्यात प्रामुख्याने ‘पॅन सिटी’ आराखड्यासाठी ‘ई अ‍ॅण्ड वाय’ या सल्लागार संस्थेची नियुक्ती करणे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीचा फेरआढावा घेणे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आदेशानुसार स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करणे. सन 2017 या आर्थिक वर्षासाठी लेखापालाची नियुक्ती करणे. पुणे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत आलेल्या वाहतूक व्यवस्थापनासाठी (एटीएमएस) वाहतूक जंक्शन उभारणीचा खर्चाचा हिस्सा देण्याबाबत विचार करणे. ’फिक्की’ आणि स्मार्ट सिटी यांच्यात सामंजस्य करार करणे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि स्मार्ट सिटी यांच्यात करार करणे, स्मार्ट सिटीसाठी आलेल्या किरकोळ खर्चाला मंजुरी देणे यासह आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

गती मिळण्यासाठी दरमहा बैठक
आयुक्त हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून स्थानिक पदाधिकार्‍यांची दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बैठक घेतली जाणार आहे. तसेच तीन महिन्याची वाट न बघता आवश्यकतेनुसार संचालक मंडळाची देखील बैठक घेण्यात येईल. केंद्र व राज्य सरकारकडून लवकरात-लवकर निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. निधी मिळाल्यानंतर निविदा मागविण्यात येईल. प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. स्मार्ट सॉलिड बेस्ट प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. मार्च महिन्यात प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु होईल. अध्यक्षांनी सायकल सेरिंग, पादचारी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे सूचविले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. व्यवसायाचा अनुभव असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दोन संचालकांची नेमणूक केली जाणार आहे.

यांची होती उपस्थिती
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तथा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संचालक महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे उपस्थित होते.