पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचार्यांसाठी खरेदी करण्यात येणार्या ‘स्मार्ट वॅाच’चा प्रस्तावाला स्थायी समितीने फेटाळला आहे. नागपूरच्या मे. आय. टी. आय. लिमिटेड बेंगलोर संस्थेकडून चार वर्षात सुमारे 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपयाची थेट खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे होता. थेट पध्दतीने होणारी ही खरेदी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर केली जात आहे. त्यावर विरोधी पक्षाने आरोप करत खरेदी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव तहकूब केला. आगामी बैठकीत सविस्तर माहिती सादर करावी. त्यानंतर योग्य असल्यास हा प्रस्ताव मंजूर केला जाईल, असे स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले. महापालिका आरोग्य विभागाकडील स्वच्छतेचे कामकाज करणार्या सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम व सफाई कर्मचारी तसेच घंटागाडी ठेकेदार व स्वच्छता विषयक ठेकेदारांकडील आरोग्य कामगार स्मार्ट वॅाच खरेदी करण्यात येणार होते. एक घड्याळ तब्बल 4 हजार 544 रुपये असून मे. आय .टी. आय. लि. बेंगलोर या संस्थेकडून थेट पध्दतीने प्रथमत: चार वर्षासाठी प्रत्येक नगासाठी दरमहा 287 रुपये अधिक जीसीटी या दराने उपलब्ध करणार होते. त्यात दरमहा 13 लाख 4 हजार 128 रुपये आणि एक वर्षासाठी एकूण 1 कोटी 56 लाख 49 हजार 536 रुपये आहे. त्यामुळे चार वर्षासाठी एकूण 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपये अधिक जीएसटी प्रमाणे येणार्या खर्चास स्थायीच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर केला होता.