‘स्मार्ट वॅाच’ खरेदीत कोट्यावधीचा डल्ला

0
चार वर्षात सुमारे 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपये होणार खर्च 
पारदर्शक कारभारात थेट नागपूर कनेक्शन
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी ‘स्मार्ट वॅाच’ खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. नागपूर महापालिकेच्या धर्तीवर नागपूर येथील मे.आय.टी.आय.लिमिटेड बेंगलोर संस्थेकडून चार वर्षात सुमारे 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपयाची थेट खरेदी करण्याचा घाट घातला आहे. हा प्रस्ताव मंगळवार दि. 11 डिसेंबरच्या स्थायी समितीसमोर ऐनवेळी ठेवला जाणार आहे. त्यामुळे पालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांनी स्मार्ट वॅाच खरेदीत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन ही कोणाला तरी डोळ्यासमोर निविदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे.
घड्याळासाठी दरमहा मोजणार 287 रुपये…
महापालिका आरोग्य विभागाकडील स्वच्छतेचे कामकाज करणार्‍या सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम व सफाई कर्मचारी तसेच घंटागाडी ठेकेदार व स्वच्छता विषयक ठेकेदारांकडील आरोग्य कामगार स्मार्ट वॅाच खरेदी करण्यात येणार आहे. एक घड्याळ तब्बल 4 हजार 544 रुपये असून मे.आय.टी.आय.लि. बेंगलोर या संस्थेकडून थेट पध्दतीने प्रथमता चार वर्षासाठी प्रत्येक नगासाठी दरमहा 287 रुपये अधिक जीसीटी या दराने उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये दरमहा 13 लाख 4 हजार 128 रुपये आणि एक वर्षासाठी एकूण 1 कोटी 56 लाख 49 हजार 536 रुपये आहे. त्यामुळे चार वर्षासाठी एकूण 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपये अधिक जीएसटी प्रमाणे येणार्‍या खर्चास मान्यता देण्यात येणार आहे.
थेट खरेदी करण्याची घाई…
तब्बल साडे सहा कोटीची डिजीटल घड्याळे थेट पध्दतीने उपलब्ध करुन खरेदीसाठी चांगलीच घाई करण्यात येत आहे. थेट पध्दतीने घड्याळे उपलब्ध करुन घेण्याऐवजी रीतसर निविदा मागविल्या असत्या तर निकोप स्पर्धा होऊन यापेक्षा स्वस्त दरात स्मार्ट घड्याळे उपलब्ध झाली असती. तसेच गुणवत्ता, दर्जेदार मिळाली असती.
नागरीकांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम खरेदी अथवा भाड्याने हे शब्द न वापरता उपलब्ध करुन देणे असे शब्द वापरले आहेत. याबाबत सविस्तर स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. आणि जर भाड्याने स्मार्ट घड्याळे घेणार आहोत तर मग एवढ्या रकमेत आपण कितीतरी स्मार्ट घड्याळे खरेदी करु शकणार नाही का? असा सवालही साने यांनी उपस्थित केला आहे.
ठेकेदार पोसण्याचा प्रशासनाचा घाट…
सदर विषयपत्रामध्ये स्वच्छता विषयक ठेकेदारांकडील आरोग्य कामगार यांच्यासाठीही स्मार्ट घड्याळे महापालिका घेणार आहे. स्वच्छता ठेकेदारांना मनपाने ठेका दिलेला आहे. त्यासाठी मनपा लाखो रुपये मोजत आहे. या खाजगी स्वच्छता कामगारांना मनपामार्फत स्मार्ट घड्याळे कशासाठी पुरविण्यात येत आहेत? हि जबाबदारी ज्याने स्वच्छतेचा ठेका घेतला आहे, स्मार्ट घड्याळे कामगारांना पुरविण्याची त्याची जबाबदारी नाही का? असे म्हणत ठेकेदारांना पोसायची कामे मनपा करणार आहे काय? असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे सदरची निविदा रद्द करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साने यांनी दिला आहे.