स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने केले शहराचे सर्वेक्षण
संधी देणारे शहर म्हणूनही नागरिकांनी दिला कौल
पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने शहराचे सर्वेक्षण करून नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडकडे अनेक जण ‘संधीचे शहर’ म्हणून पाहात असल्याचे आढळून आले आहे; तसेच ‘स्मार्ट व स्वच्छ शहर’ म्हणून बहुतांश नागरिकांनी पसंती दिली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे. त्यानुसार महापालिकेचे नियोजन सुरू असून, आराखडा आखला आहे. त्याअंतर्गत शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची मतं जाणून घेतली आहेत.
मध्यवर्ती ठरले पिंपरी गाव
शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून 25 टक्के नागरिकांनी पिंपरीगाव व परिसराला महत्त्व दिले आहे. शहराच्या वैभवात भर घालणारी काही ठिकाणी महापालिकेने विकसित केली आहेत. त्यात काही ऐतिहासिक, धार्मिक असून काही उद्याने व पर्यटन केंद्र आहेत. त्यातील निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूह, दुर्गादेवी टेकडी, महापालिका संगीत अकादमी, चिंचवडगावातील चापेकर चौक, मोरया गोसावी समाधी मंदिर, पुणे-मुंबई महामार्ग, ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, बर्ड व्हॅली, पवना नदी, इंडस्ट्रिअल हब आणि नाशिक फाटा दुमजली उड्डाण पूल या स्थळांपैकी भक्ती-शक्ती शिल्प समूहाचा 16 टक्के नागरिकांनी अभिमानास्पद असा उल्लेख केला आहे.
स्मार्ट व स्वच्छ शहर
शहराबद्दल नागरिकांचे मत जाणून घेताना ‘स्मार्ट आणि नियोजित शहर’ म्हणून अधिक पसंती दिली आहे. साधारणतः 35 टक्के नागरिकांनी स्मार्ट आणि स्वच्छ शहर अशा शब्दांत गौरव केला आहे. काही गावांचे मिळून अल्पावधीत नावारूपाला आलेल्या शहराच्या नियोजित विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळेच स्मार्ट शहर, स्वच्छ शहर व हरित शहरासाठी आवश्यक उपक्रम अधिक वेगाने राबविणे शक्य होत असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे.
हे देखील वाचा
भविष्यातील अपेक्षा
औद्योगिकनगरी अशी शहराची ओळख आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली, मोशी, तळवडे आदी भागात औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती झालेली आहे. हिंजवडी आयटी पार्कलगतच्या वाकड भागाचाही यात समावेश आहे. त्यामुळे शहराचे औद्योगीकरण आणि होणार विकास पाहता नागरिकांनी ‘संधीचे शहर’ म्हणून शहराचे वर्णन केले आहे. त्या खालोखाल ‘डिजिटल सिटी’ म्हणून पसंती दर्शवली आहे.
नागरिकांच्या अपेक्षा
ध्येय टक्केवारी
संधीचे शहर 18.3
स्मार्ट सिटी 17.7
क्लीन सिटी 17.3
हरित शहर 13.4
डिजिटल सिटी 12.3
नद्यांची स्वच्छता व प्रदूषणमुक्त शहर करायला हवे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास अतिरिक्त वाहतुकीचा ताण कमी होईल. ग्रीन सिटी होण्यासाठी वृक्षरोपणावर भर दिला पाहिजे. दुर्गा टेकडीसारखे उपक्रम आरोग्यासाठी लाभदायी आहेत, असे उपक्रम इतरत्र राबवावेत.
डॉ. अभय तांबिले