स्मार्ट सिटीअतंर्गत प्रायोगिक तत्वावर शहरातील 12 शाळा होणार स्मार्ट

0
15 जानेवारीपर्यंत शहराच्या उर्वरित भागात ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ होणार सुरू
महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी दिली माहिती
पिंपरी : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवडमधील बारा शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. तसेच 15 जानेवारीपर्यंत शहराच्या उर्वरित भागात ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी सात हजार सायकली खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी संचालकांची बैठक बुधवारी झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, सह शहर अभियंता राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण उपस्थित होते.
सात हजार सायकलींची खरेदी
या बैठकीत प्राथमिक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर अनुपस्थित असल्याने ही बैठक गुरूवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर राहुल जाधव म्हणाले, स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. 40 कोटी निधी खर्च करुन त्याअंतर्गत अत्याधुनिक सेवासुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर 12 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. याशिवाय शहराच्या उर्वरित भागात 15 जानेवारीपर्यंत ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सात हजार सायकली खरेदी करण्यात येणार आहेत.
या शाळा होणार स्मार्ट
पिंपळे गुरव येथील 54 नंबरची शाळा, चिखली म्हेत्रे वस्तीतील शाळा, सांगवीतील पी.एच.होळकर मुलांची शाळा क्रमांक 49 आणि पिंपळे सौदागर येथील 51 नंबरची या चार प्राथमिक शाळा तसेच पिंपळे गुरव, पिंपळेसौदागर येथील दोन माध्यमिक शाळा, जाधववाडी येथील साई जीवन विद्यामंदिर, निगडीतील मधुकर पवळे स्कूल, लांडेवाडी भोसरी येथील सावित्रीबाई फुले शाळा, चिखलीतील महापालिका शाळा मुले आणि मुली, कुदळवाडी येथील महापालिका शाळा, जाधववाडी येथील मुले मुली शाळा, तळवडे येथील अंतुजी भालेकर शाळा, भाटनगर पिंपरी येथील नवनाथ दगडू साबळे शाळा, मोहननगर चिंचवड येथील खिवंसरा पाटील शाळा या शाळांची पहिल्या टप्यात निवड केली आहे.