स्मार्ट सिटीची पहिलीच सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळली

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा शुक्रवारी पार पडली. ही सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळण्यात आली. बैठकीचे केवळ सोपस्कार पार पडले गेले. बैठकीत कंपनी स्थापनेसह विविध 20 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळची बैठक सायंकाळी
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करिर सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी पिंपरी पालिका मुख्यालयात आले. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आणि सात वाजता तर करिअर बैठक संपून निघूनही गेले. ही सभा केवळ 25 मिनिटात गुंडाळण्यात आली. या सभेला स्मार्ट सिटीचे संचालक महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग उपस्थित होते.

कुटे, चिखलेंचा समावेश
स्मार्ट सिटीच्या विषय पत्रिकेवर 20 विषय होते. त्यात प्रामुख्याने स्वाक्षरीचे अधिकार बहाल करणे, शिक्क्याला मंजुरी देणे, कार्यालयीन पत्ता अधिकृत करणे, कंपनी सचिव, कंपनी चार्टडअकाऊंटंटची (सीए) नेमणूक करणे, एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅनसिटी प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे या प्रमुख प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला.

स्मार्ट सिटीच्या पहिली सभा चांगल्या वातावरण पार पडली. पॅनसिटी आणि मॉडेल वॉर्डचा पुढील दोन महिन्यात सर्व्हे करण्यात येणार असून त्याचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल. पहिल्या टप्प्यांत नागरिकांसाठी उपयोगी पडणा-या सुविधा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच हॉकर्स झोनसाठी धोरण करण्यात येणार असून सर्व समावेशक स्मार्ट सिटी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
-एकनाथ पवार, सभागृह नेते