पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटी अध्यक्षांना वेळ नसल्याने स्मार्ट सिटी लिमिटेडची शनिवारी होणारी पहिली बैठक रद्द झाली. पुन्हा लवकरच कंपनीची बैठक होणार असून, नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी आणि एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीच्या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
महापालिकेत होते बैठकीचे आयोजन
स्मार्ट सिटीसाठी ‘एसपीव्ही’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन केले आहे. एसपीव्ही कंपनी स्थापनेनंतर पहिलीच बैठक महापालिकेतील मुख्य भवनात शनिवारी सकाळी अकरा वाजता होणार होती. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह संचालक उपस्थित राहणार होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आणि महत्त्वाच्या कामामुळे अध्यक्ष डॉ. नितीन करीर हे बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे नियोजित सभा रद्द करण्यात आली.
सर्व संचालकांनाही दिली माहिती
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, स्मार्ट सिटी कंपनीची पहिली बैठक शनिवारी होणार होती. मात्र, अध्यक्षांना ऐनवेळी महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी कळविले होते. तसेच सर्व संचालकांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यामुळे नियोजित बैठक रद्द केली आहे. लवकरच ही बैठक घेण्यासाठी नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.