‘स्मार्ट सिटी’चे कंट्रोल सेंटर बेकायदेशीर?

0

पुणे । स्मार्ट सिटी योजनेंअंतर्गत संपूर्ण शहरात उभारण्यात आलेल्या स्मार्ट एलिमेंट (डिजीटल डिस्प्ले) वरून वाद सुरू असतानाच या डिस्प्लेंच्या नियंत्रणासाठी स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून उभारलेले कमांड आणि कंट्रोल सेंटरला महापालिकेने जागा दिली नसल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी मुख्यसभेत दिली. त्यामुळे हे सेंटर बेकायदेशीर असल्याच्या विरोधकांच्या टिकेला पुष्टीच मिळाली आहे. यावरून आता आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

हे कमांड कंट्रोल सेंटर सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे उद्यानासमोर पालिकेच्या मुख्यसभेची मान्यता न घेता, मंडईसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आले असून ते बेकायदेशीर असल्याची टीका महापालिकेतील विरोधीपक्षांनी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यानी याचे उद्घाटन करू नये, अशी मागणी केली. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाकडून ही जागा रितसर देण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. बुधवारी मुख्यसभेत कुलकर्णी यांनी महापालिकेकडून अजून एकही जागा दिली नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.