विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी घेतला आक्षेप
पिंपरी-चिंचवड : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज राजभाषा असलेल्या मराठीतूनच करावे, असा आदेश असतानाही त्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर पडला आहे. पालिकेच्या स्मार्ट सिटीची विषयपत्रिका इंग्रजी भाषेत काढली आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
हे देखील वाचा
राज्य सरकारचा आदेश धाब्यावर
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज राजभाषा असलेल्या मराठीतूनच करावे, असा आदेश तीन महिन्यापूर्वी राज्य सरकारने काढला. त्यानुसार पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील पालिकेचे सर्व कामकाज मराठीतूनच करावे. तसेच राजभाषेचा वापर करण्यास टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाईची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तथापि, ज्यांनी आदेश काढला व स्मार्ट सिटीचे ‘सीईओ’ असलेल्या आयुक्त हर्डीकर यांनाच मराठी भाषेचा विसर पडला आहे. स्मार्ट सिटीची विषयपत्रिका इंग्रजी भाषेत काढली आहे. त्याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी तीव्र आक्षेप घेत आयुक्तांवर हल्ला केला. तसेच आता कोणावर शिस्तभंगाची कारवाई करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी देखील स्मार्ट सिटीचे संपूर्ण कामकाज मराठी भाषेतूनच व्हावी, अशी मागणी केली होती. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.