स्मार्ट सिटीच्या कामांसाठी जानेवारीअखेर 200 कोटी

0

पिंपरी-चिंचवड : शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणार्‍या कामासाठी जानेवारीअखेर 200 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामाला ख-या अर्धाने वेग येईल. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामांना वेग द्या. केंद्राच्या निधीची वाट न पाहता निविदा प्रक्रिया पूर्ण करा आणि प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, असा सूचना पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या गुरूवारच्या बैठकीत देण्यात आल्या. आयुक्त दालनात झालेल्या बैठकीला महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण उपस्थित होते. मात्र, संचालक असलेले विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले बैठकीला उपस्थित नव्हते.

कार्यालयाचा शोध सुरू
स्मार्ट सिटीसंदर्भात कामकाज अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. विविध योजनासंदर्भात निविदा प्रक्रिया राबवा. कामांना गती द्या. स्मार्ट सिटीचे कार्यालयाचा शोध घेण्यात येत असून, मासुळकर कॉलनी येथील महापालिकेच्या तंत्रनिकेतन शाळेच्या इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. लवकरच कार्यालय सुरू करावे.

मनुष्यबळ नेमण्याची गरज
स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू करण्यासाठी मनुष्यबळ नेमावे. घनकचरा व्यवस्थापन, शहर सार्वजनिक वाहतुक, वायफाय योजना आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, जानेवारीत केंद्राकडून सुमारे 200 कोटींचा निधी मिळणार आहे. तोपर्यंत महापालिकेने स्वत:चा निधी वापरून कामास गती द्यावी, असे सूचना पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना केल्या आहेत. या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी कामांचा आढावा घेण्यात आला.