स्मार्ट सिटीच्या निविदेत ’रिंग’ झाल्यास निविदा रद्द : आयुक्त

0

पिंपरी चिंचवड : स्मार्ट सिटीच्या कामात ’रिंग’ झाल्याचा संशय व्यक्त करणारे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने त्यांना माहिती देण्यात येत आहे. निविदेमध्ये काहीही चुकीचे झाले नाही. चुकीचे झाल्यास मी स्वत: निविदा रद्द करेल’’ असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेत तक्रारी तर कायमच येत असतात. निविदेबाबतचा निर्णय मी एकटा घेणार नसून स्मार्ट सिटीचे बोर्ड घेईल, असेही ते म्हणाले.

शत्रुघ्न काटेंनी व्यक्त केला संशय…

स्मार्ट सिटीच्या योजनेत पहिल्या टप्यात समावेश झालेल्या पिंपळे सौदागर आणि पिंपळेगुरव या परिसरातील भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत ’रिंग’ झाल्याचा संशय व्यक्त केला. रिंग करुन एल अ‍ॅन्ड टी कंपनीला काम देण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची तक्रार त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. विविध शंका उपस्थित करत त्यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.

निर्णय माझ्या एकट्याचा नाही…

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ’महापालिकेत तर तक्रारी कायमच येत असतात. स्मार्ट सिटीच्या निविदेत रिंग झाली नाही. सर्वांत कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली आहे. ज्यावेळी ’रिंग’ झाली आहे, असे स्पष्ट होईल. त्यावेळी निविदा प्रकिया रद्द करण्यात येईल. तसेच ही निविदा मंजूर करण्याबाबतचा निर्णय मी एकटा घेणार नाही. स्मार्ट सिटीचे बोर्ड त्याबाबतचा एकत्रित निर्णय घेणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती त्यांना देत आहोत’.