स्मार्ट सिटीतर्फे सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन

0

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात स्मार्ट सिटीतर्फे पुणे स्मार्ट विक हा सांस्कृतिक सप्ताह राबवण्यात येणार आहे. अकरा दिवसांच्या या सप्ताहादरम्यान नागरिकांसाठी चित्रपट, नाटके, नृत्यप्रदर्शन, कला, संगीत यासह विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्मार्ट सिटीतर्फे 14 ते 24 फेब्रुवारीदरम्यान शहरात हा सप्ताह पार पडणार आहे. या माध्यमातून नागरिकांसाठी शहरातील वैविध्यपुर्ण असा सांस्कृतिक खजिन्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, कलात्मक, सांस्कृतिक आणि वैचारिक देवाण-घेवाण व्हावी आणि कलेच्या उपासनेला पाठबळ मिळावे हा सप्ताह राबवण्यामागील उद्देश आहे. पुणे महापालिका, शहर पोलीसांचाही यात सहभाग असणार आहे. शहराला लाभलेला सांस्कृतिक वारसा जपत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणेकरांना विनाशुल्क विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, संभाजी उद्यान आदी ठिकाणी कार्यक्रम पार पडतील. दरम्यान, कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित राहणार असून मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीसाठीही प्रयत्न सुरु असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल, लघुपट महोत्सव, स्टॅण्ड अप कॉमेडी, नाटक, फ्युजन नृत्य, कार्यशाळा, खाद्य महोत्सव, स्थानिक कला, कविता, पुस्तक वाचन, पपेट शो, ओपन एअर चित्रपटगृह, ठराविक चौकांमध्ये कलात्मक रचनांची उभारणी (आर्ट इंस्टॉलेशन), स्मार्ट इंटरअ‍ॅक्टीव्ह बूथ, किऑस्क, बँड वॉर कॉम्पिटीशन, फोटो बूथहॅ शटॅग स्मार्ट पुणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.