स्मार्ट सिटीबाबत जनजागृती होणे गरजेचे

0

पिंपरी-चिंचवड :भारतात अजूनही स्मार्ट सिटी संकल्पनेची सर्वमान्य अशी व्याख्या नाही त्यामुळे स्मार्ट सिटी बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शहरी विकास व नियोजन महामंडळाचे प्रमुख आर श्रीनिवास यांनी व्यक्त केले. ताथवडे येथील जेएसपीएम संचलीत राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या स्मार्ट सीटी विषयक परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे स्मार्ट सीटीचे ज्ञान अधिकारी मनोजित बोस,पुणे मित्रचे सल्लागार एस बी लिमये, जेएसपीएमचे संचालक डॉ रवी जोशी, ताथवडे कॅम्पसचे संचालक डॉ पी.पी विटकर, शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ आर के जैन, उपप्राचार्य डॉ अविनाश देवस्थळी, शैक्षणिक संचालक डॉ ए जी खरात, कॅम्पसचे सहसंचालक प्रा सुधीर भिलारे, रवी सावंत, डॉ रविराज सोरटे, समन्वयक डॉ गोपाळ आलापुरे आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त गुंतवणूक हवी
श्रीनिवास म्हणाले, सरकार कोणतेही असो, स्मार्ट सिटी उभारणीसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे भव्य असे प्रकल्प तर उभे राहतीलच, त्याच बरोबर स्मार्ट सिटीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे देशातील सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झालेला असेल. राहणीमान उंचावणार आहे. रस्ते, पर्यावरण, वाहतूक, वीज, शून्य अपघात असे सुविधा सुलभ होईल. वाढत्या वाहनांमुळे दिल्लीत पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे. अशा समस्यांवर मात करायची आहे. यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे.

शाश्‍वत विकास साधायचा
बोस म्हणाले, यांनी स्मार्ट सिटीचे वैशिष्ट्ये सांगत स्मार्ट सिटीद्वारे सर्वसमावेशक असा शाश्‍वत विकास साधायचा आहे. दुसर्‍या सत्रात खरगपूर येथील आयआयटीचे डॉ अब्राहम जॉर्ज, पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, ज्ञानदेव झुंजारे, अतुल बोनागिरी, उदयसिंह क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. अमरीश क्षीरसागर व प्रा भारती महाजन यांनी केले. आभार रविराज सोरटे यांनी मानले. तसेच विद्यार्थ्यांनी भित्तीचित्रांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीची संकल्पना सादर केली.