‘स्मार्ट सिटी’ला जागेचे केवळ 1 रुपया भाडे

0

महापालिका आकारणार अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागांवर भाडे; कंपनीला 42 जागा देणार

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरातील महापालिकेच्या औंध-बाणेर- बालेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागांवर उद्याने, स्मार्ट कम्युनिटी मार्केट, स्मार्ट सिटी क्लिनिक, फायर स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी महापालिका स्मार्ट सिटी कंपनीला 42 जागा देणार असून नाममात्र दरमहा 1 रुपया भाड्याने या जागा देण्यात येणार आहेत. विकसनाचा खर्च स्मार्ट सिटी करणार असून करार संपल्यावर जागा परत घेतल्या जातील. महापालिका शहर सुधारणा समितीकडून यासंदर्भातील प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी होणार आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात विकासकामे केली जात आहेत.

कंपनीकडेच देखभाल-दुरुस्ती

यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने औंध- बाणेर-बालेवाडी भागांतील 42 मोकळ्या जागा महापालिकेकडे मागितल्या आहेत. या विकासकामांचा नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे महापालिका व स्मार्ट सिटीचा संयुक्त प्रकल्प म्हणून या जागा स्मार्ट सिटीकडे दिल्या जाणार आहेत. उभारल्या जाणार्‍या प्रकल्पांसाठी नागरिकांना मोफत अथवा किरकोळ शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना असणार आहे. या विकसित जागेची देखभाल-दुरुस्ती स्मार्ट सिटी कंपनीने करावयाची आहे, तसेच जागा वापरताना बांधकाम विभागाचे व संबंधित विभागाचे अभिप्राय घेणे बंधनकारक आहे. पाच वर्षांच्या मुदतीनंतर स्मार्ट सिटीने संबंधित विकसित जागा महापालिकेकडे सोपविणे बंधनकारक असल्याची माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी दिली.

बैठकीत उपसूचनांना मंजुरी

बालेवाडी येथील सर्व्हे नंबर 35च्या आरक्षित जागेवर स्मार्ट सिटीअंतर्गत उद्यान विकसित करणे, घोरपडे पेठेतील श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यानातील अर्धवट कामे पूर्ण करणे, रविवार पेठ, वाकडेवाडी, कर्वेनगर, खराडी येथील प्ले ग्राऊंड विकसित करणे, गाडीखाना दवाखान्यामागील जागेत कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय विकसित करणे, सुंदराबाई शाळेशेजारील उद्यान विकसित करणे, कात्रजमधील राजस सोसायटीतील मोरया उद्यान व कात्रज सर्व्हे नंबर 48 येथील आरक्षित जागेवर उद्यान विकसित करणे, अशा उपसूचनांनाही समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

नगरसेवकसुद्धा सरसावले

स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरातील अन्य जागा विकसित करण्यात याव्यात यासाठी नगरसेवकसुद्धा सरसावले आहेत. नगरसेवकांनी शहर सुधारणा समितीच्या बैठकीमध्ये शहरातील अन्य उद्यानांच्या विकसनासाठी याचीच समितीमध्ये दिली. स्मार्ट सिटीकडे निधी असल्यामुळे या उद्यानाचा विकास होईल. यासाठी महापालिकेत स्वतंत्र तरतूद करावी लागणार नाही, हा या मागचा उद्देश आहे.