पुणे । 24 तास समान पाणी पुरवठ्यासाठी बालेवाडी जकात नाक्याच्या जागेत उभारल्या जाणार्या तब्बल 35 लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे काम महापालिका आयुक्तांनी बंद केल्याचे समोर आली आहे. ही टाकी उभारल्यास स्मार्ट सिटीत उभारल्या जाणार्या ट्रान्सपोर्ट हबची शोभा जाईल, असे कारण पुढे करत अर्धवट काम झालेल्या या टाकीसाठी दुसरी जागा शोधण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.
35 लाख लिटरची टाकी
महापालिकेकडून 3 हजार कोटी रुपये खर्चून समान पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात 245 कोटी रुपये खर्चुन सुमारे 83 पाणी टाक्या उभारल्या जाणार आहेत. या अंतर्गत स्मार्ट सिटीतून बाणेर-बालेवाडी भागात 24 तास पाणी पुरवठा आणि पाणी मीटर बसविण्यात येणार होते. त्यानुसार, या भागात सर्वात मोठी तब्बल 35 लाख लिटर क्षमतेची पाणीटाकी उभारली जाणार होती. त्याचे कामही मागील वर्षी सुरू झाले. ते सुरू असतानाच दीड महिन्यापूर्वी आयुक्त कुणाल कुमार यांनी अचानक हे काम बंद करण्याचे आदेश प्रशासनास दिले.
ट्रान्सपोर्ट हबला अडथळा
टाकीमुळे या परिसरात उभारल्या जाणार्या ट्रान्सपोर्ट हबची शोभा जाईल. तसेच, ही टाकी या कामास अडथळा ठरेल, असे सांगत हे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला बाणेर-बालेवाडीला लवकरच मुबलक पाणी देणार, असे आश्वासन महापालिका उच्च न्यायालयात देत असली, तरी दुसर्या बाजूला पाणीपुरवठ्यात अडथळे आणले जात असल्याचे बोलले जात आहे.
ट्रान्सपोर्ट हबची शोभा जाईल
बालेवाडी येथील या जागेवर पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसडीसीएल) कंपनीकडून मेट्रो, पीएमपी, खासगी बसेस, रिक्षा तसेच एसटी बससाठी ट्रान्सपोर्ट हब उभारले जाणार आहे. यातून कंपनीच्या प्रकल्पासाठी निधी उभारला जाणार आहे. मात्र, येथे पाणी टाकी उभारल्यास या ट्रान्सपोर्ट हबची शोभा जाईल, असा जावई शोध कंपनीच्या सल्लागारांकडून लावण्यात आला. त्यानुसार, तत्कालीन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने या टाकीचे काम थांबविण्याचे आदेश देऊन टाकीसाठी नवीन जागेचा शोध सुरू केला आहे.
काही लाखांचा खर्च पाण्यात’ जाणार
तब्बल 8 ते 10 कोटी रुपये खर्चून ही टाकी उभारली जाणार होती. टाकीचा पाया तसेच पिलर उभारणीचे काम अर्धवट झाले आहे. त्यातच आता हे काम बंदच करून ही टाकी हलविली जाणार आहे. त्यासाठी केलेला काही लाखांचा खर्च पाण्यात’ जाणार आहे. त्यामुळे हा खर्च कोण भरून देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समान पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेकडून तब्बल 2 हजार 100 कोटींचे कर्ज काढले जाणार आहे. अशा स्थितीत टाक्यांचे काम बंद करून नवीन टाक्या उभारल्यास त्याचा खर्च वाढणार असून त्याचा भार अप्रत्यक्षपणे पुणेकरांवरच पडणार आहे.