ठाणे : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा येथे मुंबई-पुणे महामार्गावर पाच दिवसापासून एक झाड उगवल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात हे झाड म्हणजे महामार्गावरील भुयारी गटाराच्या तुटलेल्या झाकणाला पर्याय असल्याचे स्पष्ट होत आहे.
कळवा येथील मनीषानगर गेट क्रमांक १ येथे मुंबई : पुणे महामार्गाखालुन भुयारी गटार असून त्यावर ठिकठिकाणी लोखंडी जाळ्यांची झाकणे बसवण्यात आली आहेत. मात्र मनीषानगर गेट क्रमांक १ समोर सदर महामार्गातील भुयारी गटारावरील झाकण्याच्या जाळ्या कुणीतरी कापून नेल्या. हा प्रकार काही नागरिकांना दिसल्याने त्यांनी अपघात होऊ नये यासाठी त्या तुटलेल्या झाकणात झाडाची मोठी फांदी तोडून उभी केली. त्यामुळे जणू रस्त्यामध्ये झाड उगवल्यासारखे चित्र दिसत आहे. या महामार्गावर ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची, वाहनांची सतत वर्दळ असते. तुटलेल्या झाकणामुळे रात्रीच्या वेळी तेथे पाय अडकून एखाद्याला दुखापत होऊ शकतो वा एखाद्या वाहनाला अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकते.
पाच दिवस उलटूनही येथून प्रवास करणारे ठाणे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस देखील मात्र कुणीही या तुटलेल्या झाकणाची महापालिकेकडे तक्रार केल्याचे दिसून येत नाही. पादचारीही त्याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नसल्याचे जाणवते. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाची सजगता व ठाणेकरांची नागरी सुविधांप्रती असलेली उदासीनता या घटनेतून समोर येत आहे.