पुणे । नव उद्योजकांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या स्टार्ट अप’ मोहिमेला आता स्मार्ट सिटीही पाठबळ देणार आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) च्या माध्यमातून पुणे आयडीयल फॅक्टरी फाउंडेशन (पिफ) ही उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा खर्च ‘स्टार्ट अप’ योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
‘पिफ’ ही कंपनी मागील वर्षी स्थापन करण्यात आली होती. मात्र, त्याचे कामकाज अजूनपर्यंत एकदाही झालेले नव्हते. त्यामुळे हे कामकाजही पुन्हा सुरू केल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. ज्या शहरांची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली आहे. त्यांनी शहरांनी ‘स्टार्ट अप’ला चालना देण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून काम करण्याचे धोरण आहे.
सल्लागार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक
‘पिफ’मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्लागार म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, उद्योजक राहूल बजाज, गणेश नटराजन यांच्या सारख्या मान्यवरांचा समावेश आहे. नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे, इम्क्युबेशन सेंटर निर्माण करणे, नवीन उद्योजकांसाठी चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण करणे, स्टार्ट अपसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आलेला आहे. त्यानुसार, या उपकंपनीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या कंपनीसाठी दोन संचालक असून त्यात महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा समावेश आहे.
दर्जा सुधारण्यासाठी अनुदान
या कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुढील 3 वर्षे प्रत्येकी 5 कोटींचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या खर्चाच्या अंदाजपत्रकात केंद्राने त्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार, नवीन ‘स्टार्ट अप’ आणि जुन्या सुरू असलेल्या स्टार्टअपला दर्जा सुधारण्यासाठी सबसिडी बेस अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीची नियमावली तसेच धोरण तयार करण्यात येत असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. या निधीतून स्टार्ट अपच्या व्यवस्थापनासाठी कर्मचारीही नेमले जाणार असून कार्यशाळा, चर्चासत्र, उद्योजक परिषदाही घेतल्या जाणार असल्याचे जगताप म्हणाले.