महापालिका व फ्रान्सचे औद्योगिक शिष्टमंडळ यांच्यात झाली द्वीपक्षीय चर्चा
राजदूत अलेक्झांडर झीग्लर यांनी व्यक्त केले मत
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तांत्रिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी फ्रान्स तयार असल्याचे, मत फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झीग्लर यांनी व्यक्त केले. स्थायी समिती सभागृहात मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिका व फ्रान्सचे औद्योगिक शिष्टमंडळ यांच्यातील द्विपक्षीय चर्चेदरम्यान ते बोलत होते. फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झीग्लर यांच्या अध्यक्षेतेखालील शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी संदर्भात तांत्रिक क्षेत्रात मदत करण्यासाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होण्याकरिता महापालिकेस भेट देऊन माहिती घेतली. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.
फ्रान्सच्या या शिष्टमंडळामध्ये सल्लागार मंत्री व भारत आणि दक्षिण आशिया प्रादेशिक आर्थिक विभागाचे प्रमुख फ्रान्सचे दूत जीन-मार्क फेनेट, येवेस पेरीन, हर्व डुबृएल, इलिका मान, फॅनी हर्व, क्लेमेंट रॉऊशोउस, जीन मार्क मिग्नोन, सांड्रायन मॅक्समिलीएन, अमित ओझा, क्रिस्तोफर कॉम्मेऊ, एडगर ब्राउल्ट, रविन मिरचंदानी यांच्यासह 35 जणांचा समावेश होता.
यावेळी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे संचालक व विरोधी पक्षेनेते दत्तात्रय साने, मनसे गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रशांत ठाकूर, सह शहर अभियंता राजन पाटील, आयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, संजय कुलकर्णी, संजय भोसले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञानासाठी मदत करावी
यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचे आगामी काही वर्षांचे नियोजन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध प्रकल्प राबविण्याचे काम पिंपरी-चिंचवड शहरात सुरु आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी फ्रान्सने सहकार्य करावे. तसेच विविध औद्योगिक कंपन्यांनी देखील आपले तंत्रज्ञान स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंट व विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. व्हिजन 20302 बाबतची माहितीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
या शिष्टमंडळास ‘ई अँड वाय’ या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी नितीन जैन यांनी पॅन सिटीबाबत विस्तृत सादरीकरण केले. केपीएमजी या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी राजा डॉन यांनी एरिया बेस डेव्हलपमेंटचे सादरीकरण केले. तसेच प्यालाडीयम इंडियाच्या बार्बरा स्टँकोविकोवा यांनी सिटी ट्रान्सफॉर्मेशनबाबत शिष्टमंडळास सादरीकरण केले. यापूर्वी महापलिकेच्या माहितीपर चित्रफितीद्वारे शहराची माहिती देण्यात आली.