स्मार्ट सिटी संकल्पनेत नव उद्योजकांच्या कल्पना महत्वाच्या – श्रीकांत भारतीय

0
स्मार्ट सिटी संकल्पनेत त्यांच्या कल्पनांचा व उद्योजकांचा निश्‍चितच समावेश करुन घेऊ
पिंपरी चिंचवड : नवीन उद्योजकांच्या नवनवीन कल्पनांमधून उभारीस येणारे उद्योग हे सामाजिक दृष्ट्या महत्वाचे आहे. त्याचा देशाच्या विकासात नक्कीच हातभार लागेल, असा विश्‍वास मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक श्रीकांत भारतीय यांनी चिंचवड येथे व्यक्त केला. स्मार्ट सिटी संकल्पनेत कल्पनांचा व उद्योजकांचा निश्‍चितच समावेश करुन घेऊ, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या वतीने तीन महिन्याचा मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला. स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिराच्या प्रशस्तीपत्रक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
देशासाठीचा विचार करा…
यावेळी उद्योजिका श्‍वेता शालिनी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अमित गोरखे युथ फाऊंडेशनचे सर्वेसर्वा अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, धनंजय शेंडबाळे, प्रमोद निसळ, आरएसएसचे उमेश कुटे, संदीप जाधव, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते. आपली गुणवत्ता फक्त कागदावरच राहता कामा नये. गुणवत्तेचा वापर आयुष्यात जगतानाही केला पाहिजे. तुम्हाला जे व्हायचे आहे, ते नक्की व्हा. आयएएस व्हा, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा. मात्र, देशासाठी काय करता येईल, याचा नक्की विचार करा. त्याच्यावर फोकस ठेवा, असेही ते म्हणाले.
कल्याणकारी उपक्रमांची गरज…
श्‍वेता शालिनी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकारत असलेले उज्ज्वल भारताचे स्वप्न खर्‍या अर्थाने यामुळे समृद्ध होत आहे. देश खर्‍या अर्थाने सर्वबाजुंनी विकसित व्हायचा असेल तर, सर्व समाज घटकांना सामावून पुढे घेऊन जाऊ शकणार्‍या अशा कल्याणकारी उपक्रमांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंत्रज्ञानाची शक्ती ओळखून राज्यात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. राज्यातील खेडेगावांना दत्तक घेऊन तिथे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रणावर केला जात आहे. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्रातील लोकांचे जीवन प्रकाशमय झाले आहे.
उद्योगाकडे वळण्याची सुवर्णसंधी…
स्मार्ट सिटी स्मार्ट, स्टार्टअप या उपक्रमाच्या माध्यमातुन निश्‍चितच या परिसरातील युवा पिढी उद्योजकतेकडे वाटचाल करेल, या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांना उद्योगजगताकडे वळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी नॉव्हेल फोरमचे उदघाटन करण्यात आले. या उद्योजकता शिबिरात एकूण 1200 नोदणी झाली होती. त्यातील प्रथम बॅचच्या 200 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूरण केले. त्यांना प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आले. तसेच शिबिरार्थींना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गोरखे यांनी केले. सूत्रसंचालन रवी घाटे यांनी केले.