पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्मार्ट सिटीसाठी संचालक मंडळांची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. पुढच्या कार्यवाहीसाठी लवकरच स्मार्ट सिटी संचालकांची बैठक होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारकडे एकत्रित प्रस्ताव गेल्याने शहराच्या गुणवत्ता यादीत 100 पैकी 98 गुण मिळवूनही पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी योजनेतून डावलले गेले होते. शहराची पात्रता असतानाही डावलल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात नवी मुंबई महापालिका स्वत:हून स्मार्ट सिटी योजनेतून बाहरे पडली. नवी मुंबईऐवजी तिसर्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आहे.
कंपनीची अधिकृत नोंदणी
स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनी स्थापन्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू होती. त्याप्रमाणे कंपनी नोंदणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यावर केंद्राच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाले असून ’पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड’ या कंपनीची, कंपनी कायद्यानुसार अधिकृतपणे नोंद झाली आहे. कंपनीचे कार्यालय महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतच असणार आहे.
दोन संचालकांची अजूनही नियुक्ती नाही
या विशेष उद्देश वाहन कंपनीत केंद्र, राज्य सरकार व महापालिकांचे मिळून एकूण 15 संचालकांची नेमणूक झालेली आहे. कंपनी नोंदणी झाल्यामुळे अधिकृतपणे कार्यवाही सुरू होणार असून, या संचालक मंडळाची पहिली बैठक लवकरच होणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन संचालकांची अजूनही नियुक्ती झालेली नाही. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकार्यासह विविध पदे भरावी लागणार आहेत. या नियुक्त्यांबरोबर कंपनीच्या कारभाराचे धोरण व स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्प पुढे नेण्यासाठी संचालकांना अजेंडा ठरवावा लागणार आहे.