‘स्मार्ट सिटी’ संचालक मंडळाची शुक्रवारी दुसरी बैठक

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ लिमिटेडच्या संचालक मंडळाची दुसरी बैठक शुक्रवारी (दि.10) होणार आहे. या बैठकीत ‘स्मार्ट सिटी’च्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ सल्लागार नियुक्तीसंदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेतला जाणार आहे. महापालिका भवनात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बैठक होईल. अध्यक्षस्थानी ‘स्मार्ट सिटी’चे अध्यक्ष नितीन करीर असतील.

कार्यवाहीचा आढावा घेणार
‘स्मार्ट सिटी’चे प्रत्यक्ष काम करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ या सल्लागार एजन्सीची तीन वर्षांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. एकूण 29 विविध अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या या युनिटसाठी 20 कोटी 62 लाख 800 रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत इच्छुक एजन्सीची बैठकही झाली. या संदर्भातील कार्यवाहीचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

शिफारस, विचारविनिमय
मंडळाच्या 28 ऑगस्ट 2017 ला झालेल्या पहिल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करणे. ‘पॅन सिटी’ आराखड्यासाठी ई अ‍ॅण्ड वाय या सल्लागारांनी दिलेल्या अहवालावर चर्चा करणे, केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाच्या 5 जुलै 2017 च्या जीएसआर 839 (ई) स्वतंत्र संचालक नियुक्तीबाबत नोंद घेणे, आर्थिक वर्षे 2017 यासाठी कॅग पॅनेलने नियुक्त केलेल्या ऑडिटरबाबत चर्चा करून शिफारस करणे, पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून आलेल्या पत्रानुसार एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनासाठी (एटीएमएस) वाहतूक जंक्शन उभारणीचा खर्चाचा हिस्सा देण्याबाबत विचार करणे.

विविध विषयांवर चर्चा
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी व इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज (एफआयसीसीआय) मध्ये झालेल्या करारानुसार ठरविण्यात आलेल्या शहरातील भागासाठी समन्वय आणि पाठिंबा देण्याबाबत विचार करणे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत (सीओईपी) झालेल्या करारानुसार महाविद्यालय स्मार्ट रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, नगररचना, शहराचे विश्‍लेषण आदींबाबत सहकार्य करणार आहे. त्याबाबत चर्चा करून आवश्यक बदल करणे, यासह विविध विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.