पुणे । स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या मालकीची मालमत्ता स्मार्ट कंपनीच्या हातात जाणार आहे. स्मार्ट सिटी ही घोषणा केवळ लोकांची फसवणूक आहे, अशी बोचरी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेच्या जागेवर स्मार्ट सिटीचे प्रकल्प साकारले जात आहेत. महापालिकेने हजारो कोटी रुपये देऊन या जागा ताब्यात घेतल्या आहेत. त्या जागा स्मार्ट सिटी म्हणजे खासगी कंपनीला दिल्या जात आहेत. त्यामुळे पुणेकरांची फसवणूक केली जात आहे. अभ्यास न करता हा प्रकल्प आणला असून, केवळ लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जात आहे, असेही ते म्हणाले.
आम्हीही मोदींच्या प्रभावाखाली होतो
स्मार्ट सिटी मंजूर करताना आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली काहीकाळ आलो होतो. आम्ही या योजनेचा अभ्यास केला नाही याची कबुली देत तुपे यांनी आम्हाला ही योजना चांगली वाटली होती. मात्र आता फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने यापेक्षा जेएनएनयुआरएम ही योजना चांगली होती, असे आता वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली.
प्रसार माध्यमांशी बोलायचे नाही
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीतील विषयांबाबत प्रसार माध्यमांमध्ये बोलायचे नाही. बोलायचे असल्यास संचालक मंडळाच्या पूर्वपरवानगीनेच बोलायचे असा फतवा संचालकांनी काढला आहे. त्याला विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी तीव्र विरोध केला. आमचे संचालकपद गेले तरी चालेल परंतु आम्ही त्याला विरोध करणार. त्यांच्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही, दडपशाहीला बळी पडणार नाही, असे तुपे म्हणाले. स्मार्टसिटीमध्ये असे काय घडणार आहे की, आम्ही प्रसार माध्यमांशी बोलायचे नाही, असा सवालही तुपे यांनी उपस्थित केला.