हडपसर । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या पर्यवेक्षिका स्मिता करंदीकर यांना उत्कृष्ट शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत पदक आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिक्षक दिनी (दि. 5 सप्टेंबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने ही माहिती कळविली आहे.
करंदीकर यांचा अध्यापनाचा विषय भूगोल आहे. सुरुवातीच्या काळात फर्ग्युसन, स. प. महाविद्यालय, एसएनडीटी, नौरोजी वाडिया या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. गेली 26 वर्षे त्या अहिल्यादेवी शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या वर्षीपासून पर्यवेक्षिका म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे.