स्मृती इराणींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी भिवंडीत

0

भिवंडी : भिवंडी शहरातील तब्बल आठ लाख यंत्रमागधारकांचे लक्ष लागलेल्या यंत्रमाग धोरणाच्या घोषणेसाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी येत्या शनिवारी भिवंडीत येत आहेत. अंजूर फाटा येथील ओसवाल सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांच्या मेळाव्यात धोरण जाहीर करण्यात येईल.

गेल्या काही वर्षांपासून चीनी बनावटीच्या कपड्यामुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला. त्याचबरोबर मंदीमुळे व्यावसायिकांना फटका बसला. या मंदीमुळे हजारो कामगारांवर भिवंडीबाहेर पडण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी सातत्याने यंत्रमाग व्यवसायाला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर सुमारे चार महिन्यांपूर्वी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भिवंडीला भेट दिली होती. त्यात त्यांनी यंत्रमाग व्यावसायिकांबरोबर संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. तसेच लवकरच नव्या धोरणाची घोषणा होणार असल्याचे आश्वासन दिले होते. चीनपेक्षा भारतातील यंत्रमागाचा कपडा स्वस्त पडण्यासाठी धोरण आखण्यात येत आहे. तसेच यंत्रमागाला `अच्छे दिन’ येण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. येत्या तीन वर्षांत कामगारांकडून ९०० दशलक्ष मीटर कापडाची खरेदी केली जाईल, असे वस्त्रोद्योग मंत्र्यांनी जाहीर केले होते. या घोषणेमुळे यंत्रमाग कामगारांना दिलासा मिळाला होता.

अखेर केंद्र सरकारने यंत्रमाग धोरण निश्चित केले असून, येत्या शनिवारी भिवंडीत होणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धोरण जाहीर केले जाईल. या बैठकीला खासदार कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.