चेन्नई । भारत आणि ऑस्टेे्रलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 सप्टेंबररोजी चेन्नईतील एम.ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच दोन्ही संघांतील खेळाडूंनी आपण या मालिकेसाठी तयार असल्याचे संकेत देताना निरनिराळे वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मालिका सुरू होण्याआधीच कांगारूंना इशारा दिला आहे. सामन्यादरम्यान स्लेजिंग केल्यास तुम्हालाही त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ, असा दम मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दिला आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधी एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने मैदानात खिलाडूवृत्तीने वागणार असल्याचे म्हटले आहे. पण मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर विश्वास नसावा, म्हणूनच त्याने पाहुण्या संघाला सरळ तसा इशाराच दिला आहे. याआधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती.
मैदानावरील नाट्यमय घडामोडींमुळे ऑस्ट्रेलियाचा हा दौरा चांगलाच गाजला होता. ऑस्टेे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यातील मैदानातील खडाजंगी चांगलीच गाजली होती. मालिका संपल्यावर स्मिथ माफी मागून मोकळा झाला होता.
स्लेजिंग खेळाचा भाग
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शमी म्हणाला की, स्लेजिंग हा खेळाचाच एक भाग आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांनी चांगली भागीदारी केल्यावर फलंदाजांचे लक्ष विचलित करण्यासाठी स्लेज करतो. हे नैसर्गिकपणे होऊन जाते. आम्ही पण स्लेज करतो, पण त्यात कधी अपशब्दांचा वापर करत नाही. खेळपट्टीवर रुळलेल्या फलंदाजांना बाद करायचे असेल किंवा एखादी जमलेली भागीदारी तोडायची असेल तर स्लेजिंग महत्त्वाची ठरते.
त्याच भाषेत उत्तर देणार!
शमी म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगचा सामना करण्यासाठी आम्ही शंभर टक्के तयार आहोत. जर त्यांनी स्लेजिंग केले तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. मागील मालिकांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्यात सातत्य राखू. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताने निर्भेळ यश मिळवले असल्यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढले आहे.