स्लोएनचा व्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का

0

न्यूयॉर्क । मागील 11 महिन्यांपासून स्लोएन स्टिफन्स डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे टेनिस कोर्टवर उतरू शकली नव्हती. जुलै महिन्यात कोर्टवर परतलेल्या स्लोएनने वर्षातील शेवटच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीच्या लढतीत धक्कादायक निकाल नोंदवत अमेरिकेच्याच व्हीनस विल्यम्सला मात देत पहिल्यांदाच एखाद्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. स्लोएनने पहिला सेट 6-1 असा जिंकत चांगली सुरुवात केली. पण दुसर्‍या सेटमध्ये अनुभवी व्हीनसने 6-0 अशी बाजी मारत सामन्यात बरोबरी साधली. या बरोबरीमुळे तिसरा आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंकडून चांगली चुरस पहायला मिळाली. टायब्रेकरपर्यत लांबलेल्या लढतीत स्लोएनने 7-5 अशी सरशी मिळवत अंतिम फेरीतले स्थान निश्‍चित केले. अंतिम फेरीत स्लोएनचा सामना मेडिसन किसशी होईल. स्लोएनप्रमाणे मेडिसननेही पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेचीच 15 वे मानाकंन मिळालेली मनगटावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर 10 महिन्यांनंतर कोर्टवर परतली होती. मेडिसननने उपांत्य फेरीत 20 वे मानाकंन मिळालेल्या कोको वांडेवेगेचा 6-1, 6-2 असा पराभव केला.

विजयानंतर स्लोएन झाली भावुक
व्हीनस विल्यम्सला 2002 नंतर पहिल्यांदाच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीपासून लांब ठेवणारी स्लोएन विजयानंतर कमालीची भावुक झाली. स्लोएन म्हणाली की, बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी किती आनंद झाला आहे हे सांगू शकत नाही. अजून लढाई बाकी असून, अंतिम सामन्यात मोठ्या धैर्याने खेळावे लागेल. स्लोएनची ही आतापर्यतंची सर्वोत्तम कमागिरी आहे. याआधी तीने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. जुलै महिन्यात कोर्टवर परतल्यानंतर स्लोएनने दोन महिन्यांच्या कालावधीत 16 सामने खेळले त्यातील 14 सामने तिने जिंकले आहेत.

सानिया उपांत्य फेरीत
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने 2017 मध्ये पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. सानियाने आपली चीनची जोडीदार शुअई पेंगच्या साथीणे टिमिया बाबोस आणि एंडिया हल्काककोव्हाला मात देत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. सानिया पेंग या जोडीने हा सामना 7-6, 6-4, अशा फरकाने जिंकला.

15 वर्षांनंतर पुन्हा
सुमारे 15 वर्षांच्या अंतरानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीत दोन्ही अमेरिकन खेळाडू समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. याआधी 2002 मधील अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सने व्हीनस विल्यम्सला हरवले होते. स्लोएन आणि मेडिसन या दोघी जवळच्या मैत्रिणी असून फेडरेशन चषक स्पर्धेसाठी त्या एकत्र खेळतात. या दोघी 2015 मध्ये मियामी ओपन टेनिस स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळल्या होत्या. त्यात स्लोएनने बाजी मारली होती. मागील अनेक वर्षानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या उपांत्य फेरीत चार अमेरिकन महिला खेळाडू दाखल झाल्या होत्या. त्यात व्हीनस अंतीम फेरीत खेळेल, असा अंदाज होता.