न्यूयॉर्क । अमेरिकेच्या स्लोएन स्टीफंन्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. शनिवारी रात्री उशिराने खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लोएननेे आपली सहकारी मॅडसिन किसला 6-3, 6-0 असे हरवले. 24 वर्षीय स्टीफंसने हा सामना 61 मिनिटांमध्ये जिंकला. स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी स्टीफंस विजेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नव्हती. स्टीफंसने 22 वर्षीय मॅडीसनविरुद्ध शानदार कामगिरी करताना तिला केवळ तीन गेम जिंकण्याची संधी दिली. या विजयाबद्दल स्टिफंन्सला 37 लाख डॉलर रकमेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात स्लोएनने फक्त 6 दुहेरी चुका केल्या, तर किजकडून मात्र सुमारे 30 सहज चुका झाल्या. किजने 18 विनर शॉट्स मारले तर स्लोएनला केवळ 10 विजयी फटके मारता आले.
दोन महिन्यांपूर्वी होती 957 क्रमांकावर
अमेरिका ओपन स्पर्धा जिंकणार्या स्लोएनसाठी गेले वर्ष मोठ्या उलथापालथीचे होते. या दरम्यान तिला टेनिसकोर्टपासून लांबही रहावे लागले. त्यामुळे तीचे मानांकन ही घसरले होते. दोन महिन्यांपूर्वी स्लोएन 957 व्या क्रमांकावर होती. पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिने 11 महिन्यानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. टेनिस कोर्टवर परतल्यानंतर पहिल्याच स्पर्धेतील पहिल्याच फेरीत स्लोएन पराभूत झाली. पण त्यामुळे ती नाऊमेद झाली नाही. या पराभवानंतर पुढच्या दोन स्पर्धांमध्ये स्लोएनने थेट उपांत्य फेरीत धडक मारली. मागील एका महिन्यात तिने जागतिक क्रमवारीत 900 क्रमांकांनी मोठी झेप घेत 83 वे स्थान मिळवले. त्यानंतर तिने वर्षातील शेवटच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळण्यासाठी स्थान मिळवले. आता ही स्पर्धा जिंकल्यानंतर ती पुन्हा एकदा मोठी उडी मारून 83 व्या क्रमांकावरून थेट 22 व्या क्रमांकावर जाईल.
पाचवी टेनिसपटू
ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी स्लोएन स्टिफंस पाचवी बिगर मानांकित टेनिसपटू आहे. तर दुसरी बिगर मानांकित अमेरिकन ओपन स्पर्धेतील विजेती आहे. याआधी 2009 मध्ये बेल्जियमच्या किम क्लिस्टर्सने निवृत्तीनंतर पुन्हा टेनिस कोर्टचे परतत अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात महिला एकेरीतील अंतिम फेरीत दोन्ही अमेरिकन टेनिसपटू खेळण्याची ही सातवी वेळ आहे.
रचला इतिहास
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकून स्लोएनने नवा इतिहास रचला आहे. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठताना तीने पहिल्याच प्रयत्नात विजेतेपदाला गवसणी घातली. 19 वर्षानंतर पहिल्यांदाच व्हीनस आणि सेरेना या विल्यम्स भगिंनीशिवाय एका अमेरिकन महिला टेनिसपटूने ही स्पर्धा जिंकली आहे. याशिवाय 15 वर्षानंतर दोघा विल्यम्स भगिनींशिवाय एका अमेरिकन महिला टेनिसपटूने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.