स्वखर्चातून नगरसेविकेने बुजविले लोहगाव-वाघोली रस्त्यावरील खड्डे

0

येरवडा । पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने लोहगाव-वाघोली मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निधी मंजूर केला नसल्याने दुरुस्ती रखडली होती. याकडे लक्ष केंद्रीत करून नगरसेविका मुक्ता अर्जुन जगताप यांनी नागरिकांच्या सुरक्षितेसाठी स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजविले.

पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याच पाणी साचून राहते. याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने लोहगाव-वाघोली मार्गावर वारंवार अपघात होत होते. यामुळे नागरिकही हैराण झाले होते. दादाची पडळ, संतनगर, महादेव कॉलनी, गुरुद्वारा या लोहगाव भागातील परिसराकडे महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष होते. विविध समस्यांसह रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे रहिवाशांनी वारंवार तक्रार केल्या होत्या. राजकीय नेते व अधिकार्‍यांनी जनतेच्या मुख्य समस्येकडे पाठ फिरविली होती.

रहिवाशांचे नगरसेविकेला साकडे
या समस्येबाबत रहिवाशांनी विमाननगर प्रभाग क्र. 3 मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका मुक्ता जगताप यांच्याकडे धाव घेतली होती. लोहगाव-वाघोली रस्त्याची झालेली दूरवस्था व खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास याची माहिती जगताप यांना दिली. त्यावेळी त्यांनी आठवडाभरात रस्ते दुरुस्त करण्याचे आश्‍वासन रहिवाशांना दिले. रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेचे कोणत्याही प्रकारे बजेट नसतानादेखील त्यांनी हे आश्‍वासन दिले होते.

स्वत: बुजविले खड्डे
येथील रस्त्याची गंभीर दखल घेत याबाबत जगताप यांचे पती अर्जुन यांनी त्वरित या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. पत्नी नगरसेविका असताना देखील कामाची लाज न बाळगता अर्जुन स्वतः खड्डे बुजविण्याचे काम करत होते. या मार्गावरील खड्डे बुजल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

समस्या सोडविण्यास वचनबद्ध
प्रभागातील सर्वसामान्य जनतेने माझ्यावर विश्‍वास ठेवून मला पालिका सभागृहात जाण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जनतेच प्रश्‍न सोडविण्यास आपण वचनबद्ध असून यापुढे देखील विकासकामांच्या माध्यमातून समस्या सोडवू.
– मुक्ता जगताप,
नगरसेविका, विमाननगर