पिंपरी : शहरातील स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ असतात. त्यातून येणारी दुर्गंधीमुळे ते सर्वात दुर्लक्षित रहातात. मात्र सोमवारी जागतिक शौचालयदिनानिमित्त शहरातील विविध स्वच्छतागृहांसमोर रांगोळी रेखाटण्यात आली होती. विविध प्रकारच्या झाडाच्या कुंड्या ठेवून ही शोभा वाढविली होती. चकचकीत स्वच्छतागृह प्रवेशद्वारासमोर रांगोळ्यांचे गालिचेमन प्रसन्न करणार्या शोभेच्या झाडांच्या कुंड्या असे सारे कधी न दिसणारे चित्र पहायला मिळाले. महापालिका परिसरातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयातील चिंचवड स्टेशन येथील साफ शौचालय, खडी मशीन जय मल्हार नगर झोपडपट्टी काळभोरनगर, मोरवाडी घरोंदा हॉटेलच्या समोरील शौचालयाची चांगल्या पद्धतीने स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली होती. ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 22 मधील स्मशानभूमी शेजारी, जाधववस्ती, वाल्हेकरवाडी, गावडे जलतरण तलावाशेजारील पांढरीचा मळा येथील सार्वजनिक शौचालये यांची साफसफाई करण्यात आली.