बारामती । स्थळ-वसंतराव पवार नाट्यमंदिर, बारामती नगरपालिकेची भारत स्वच्छता मिशनमध्ये सहभाग सूचना यासाठीची घेतलेली सभा, व्यासपीठावर सुनेत्रा पवार, प्रांताधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी मंगेश चितळे, विरोधीपक्ष नेते नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, नगरपालिकेचे तमाम अधिकारी व पदाधिकारी सभागृहाची क्षमता 700, प्रेक्षकांमध्ये तब्बल साठ ते सत्तर नागरीक बारामती शहराची लोकसंख्या 70,000 हजार आणि सभेला स्वरूप प्रचाराचे. राजकीय नव्हे स्वच्छतेच्या भाषणबाजीचे या भाषणबाजीला कंटाळून दिलीप शिंदे यांनी केलेल्या प्रश्नांनी हैराण झालेली नगरपालिका असे चित्र बारामती नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचे होते.
बारामती नगरपालिकेने भारत स्वच्छता अभियानामध्ये आपल्याला पारितोषिक मिळावे यासाठी कंबर कसली खरी परंतु यासाठी बोलाविलेल्या सभेतच बोजवारा उडाला. नगरपालिकेने नियोजनात फक्त पदाधिकारी व अधिकारी असे गृहित धरूनच केल्याने नागरिकांचा सहभाग मिळालाच नाही तरीही भाषणबाजी सुरू असल्याने नागरीकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने पदाधिकारी व अधिकारी गांगरून गेले आहेत. केवळ अभियानात सहभाग घेऊन पारितोषिक मिळवायचे हाच उद्देश होता. दररोज दिसणारा कचरा व दररोजची स्वच्छता यास नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचे मानले जात आहे. आणि पदाधिकार्यांना भाषणबाजीची हौस असल्याचे नागरीकांनी बोलताना सांगितले मुळातच या सभेसाठी लोकसहभाग असावा यासाठीचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले न गेल्यामुळे सभा ही अधिकारी व पदाधिकारी यांचीच झाली. अशी चर्चा बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होती. अखेरचा मार्ग म्हणूनही पदाधिकारी व प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांचा या अभियानात सहभाग घेण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे ठरल्यानंतर शाळांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणून फर्मान काढण्यात आले.
टपर्यांचा वापर शौचालय म्हणून…
नगरपालिकेच्या समोरील शारदा प्रांगणाच्या नजीक पुनर्वसन गाळेधारकांना छोट्या टपर्या बोळात तयार केलेल्या आहेत. या टपर्यांमधून अवघे तीन चार व्यवसाय हे छोटासा व्यवसाय करीत असतात याठिकाणी पंचवीस ते तीस टपर्या असून तेथे नागरीक या टपर्यांचा स्वच्छतेऐवजी शौचालय म्हणून वापर करतात याठिकाणी नगरपालिकेच्या नगरसेविका झाडू घेऊन स्वच्छतेसाठी गेल्य आणि प्रवेश केल्याबरोबर आलेल्या दुर्गंधीमुळे फारच वेगाने परत फिरल्या हा चर्चेचा विषय झाला होता. हे ठिकाण नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा केवळ दुर्लक्ष होत असल्यामुळे हा प्रसंग ओढावला गेला आहे.