आठवड्याला एका परिपाठाचे नियोजन
मुंबई : राज्यातील शेकडो शाळांना मुलभूत सुविधा यांची वानवा असताना सरकारने शाळांमध्ये आता स्वछता अभियानाची मोहीम लादली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि त्यासाठीच्या सवयी शालेय जीवनापासून लागाव्यात यासाठी परिपाठ आणि आठवड्याला एक स्वच्छतेसाठी खास सत्र आयोजीत केले जाणार आहे. विशेष म्हणजे वर्षभर हे स्वच्छतेचे उपक्रम राबविण्याचे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून राज्य शालेय शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे उपक्रम प्रभावीपणे राबविणा़र्या शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राकडून शाळांना मानांकनही दिले जाणार आहे.
3 महिन्यात कार्यक्रम होणार पूर्ण
स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र उपक्रम राज्यातील शाळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय व्हावी यासाठी त्यांच्या दैनंदिन पाठामध्ये बदल करुन त्यात स्वच्छतेवर आधारीत संदेशाचा समावेश करण्यात येणार आहे. या स्वच्छतेच्या सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नियमितपणे संदेश पोहोचले तर त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. हे संदेश रोज देण्यात आले तर त्यांच्या मनावर ते बिंबतील आणि त्यांच्या वर्तनामध्ये बदल होईल. यावेळी शाळांना 12 सत्रे देण्यात
येणार आहे. ही सत्रे प्रत्येक आठवड्याला एक असे 3 महिन्यात हे कार्यक्रम पूर्ण होणार आहेत.
सादरीकरणाच्या फोटोंची सक्ती
यानंतर पुन्हा सत्र 1 पासून सुरू करायचे आहे. परीपाठामध्ये हे संदेश वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे आहेत. सत्रे केवळ वाचून दाखवायची नसून मुलांना त्यात सहभागी करुन घेऊन ती कृतीतून सादर करायची आहे. या सादरीकरणाचे फोटो काढण्यात यावेत. स्वच्छतेचे उपक्रम प्रभावीपणे राबविणा़र्या शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जेणेकरुन शिक्षकांमध्ये प्रेरणा टिकून राहणार असल्याचे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.