विविध उपक्रमांची अंमलबजावणी : वॉलपेंटींग, वृक्षारोपण करून स्वच्छतेचे धडे, प्लास्टीकच्या पिशव्यांवर बंदी
पुणे । इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गत शहर चकाचक करण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, नगरसेवक भरत शहा, गटनेते कैलास कदम, नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना आखण्यात येत आहेत. नगरपरिषदेचे कर्मचारी, कलाकार, नागरिक, विद्यार्थी, महिला वर्ग यांनी राबविलेल्या स्वच्छता चळवळीमुळे शहराचा कायापालट झाला आहे. स्वच्छता अॅपलाही शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे अॅप वापरण्यात शहर देशात 20 व्या क्रमांकावर आहे.महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छता हीच जनसेवा या मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते करण्यात आला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर व कर्मचार्यांनी स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले होते. शहरात ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
सेल्फी पॉईंट
टेलिफोन ऑफीस जवळील भाग स्वच्छ करून या ठिकाणी वृक्षारोपण केले. येथील झाडावर कलाकारांनी सुंदर कलाकृती काढल्याने नागरिकांसाठी हा सेल्फी पॉइंट झाला आहे. यात सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने बसस्थानक परिसराचे रूपडे पालटले. संपूर्ण परिसरात स्वच्छता, वॉलपेंटींग, वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छतेचा संदेश देणारे शिल्प साकारलेले आहेत. भार्गव तलावाची स्वच्छता करण्यात आली. स्मशानभूमीची स्वच्छता करून खत प्रकल्प तसेच वृक्षारोपण करण्यात आले आहे. कचरा डेपोमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करून खत तयार करण्यात येत आहे.
शौचालयांची संख्या वाढवली
संपूर्ण शहरात कलाकारांनी वॉल पेंटींगच्या माध्यमातून स्वच्छतेचे फलक, सुविचार व स्थलचित्र काढून शहराचे सुशोभीकरण केले. शौचालयांची संख्या वाढवली, भूमिगत गटारे बांधल्यामुळे डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण घटले आहे. कचर्याची योग्य विल्हेवाट लावून खत निर्मिती सुरू केली. ठिकठिकाणी डस्टबीन बसवून व्यापारी, नागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन केले. शहरात 50 मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली.
शहराच्या सौंदर्यात भर
शाळा व महाविद्यालयासाठी स्वच्छता स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. सामाजिक संस्था, गणेश मंडळाच्या उस्फूर्त सहभागामुळे हे अभियान लोकचळवळ बनले. विद्यार्थ्यांनी महास्वच्छता रॅली, पथनाट्य सादर करून ही चळवळ लोकभिमुक केली. कचरा व्यवस्थापनासाठी कार्यशाळेचे आयोजन केले. शहरातील सर्व दुभाजकामध्ये वृक्षारोपण झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. नारायणदास रामदास शहा चॅरीटेबल ट्रस्ट, इंदापूर महाविद्यालय, युवा क्रांती प्रतिष्ठान, रोटरी क्लब, लायनेस क्लब, इंदापूर पोलिस स्टेशन यांनी मोठे योगदान दिले आहे. अंकिता शहा यांनी शहर स्वच्छतेचे अभियान अखंडीत ठेवण्याचा तसेच नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.