जळगाव । स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने नेमलेल्या कन्सल्टींग एजन्सीच्या दिल्लीतील तीन सदस्यीय पथक शहरात दाखल झाले आहे. या एजन्सीच्या माध्यमातून शहर स्वच्छता विषय उपाययोजनांसाठी पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा तयार केला जाणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने ईको-प्रो सव्र्हीसेस कन्सल्टींग कंपनी नियुक्त केली आहे. या कंपनीच्या तीन सदस्यांनी विविध ठिकाणी फिरुन स्वच्छतेविषयक कामकाजाचा आढावा घेवून शासनाकडे सादर केल्यानंतर निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शास्त्रीय पद्धतीने कचर्यांची विल्हेवाट
शहराची पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन स्वच्छेतेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. शहरातील जमा होणार्या कचर्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावून त्यापासून कोणती उपाययोजना करता येतील याबाबत माहिती पथकाने घेतली.यासोबत आरोग्य विभागातील कर्मचार्यांची संख्या, उपलब्ध घंटागाड्या, कचरा डेपो तसेच कचरा वाहुन नेणारे वाहन दररोज किती कचरा संकलीत करतात. याबाबतची माहिती यामीनी वर्मा, मुजाहिद शेख, निखली सोनी या सदस्यांनी जाणून घेतली. तसेच त्यांनी नियमित चालणार्या कामकाजाचा देखील यावेळी आढावा घेतला.
आरोग्य विभागांच्या कामांचे केले कौतुक
शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी आरोग्यविभागाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानूसार आरोग्यधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविभागातील सर्व आरोग्य निरिक्षक, मुकादम, सफाई कर्मचारी विविध वार्डामध्ये फिरून जनजागृती करीत आहेत. प्रत्येक वार्डात घंटागाडी वेळेवर येते किंवा नाही याबाबत संबधीत आरोग्य निरीक्षकाकडून आढावा घेतला जात आहे.