स्वच्छता कामगारांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच

0

यावल । तालुक्यातील किनगाव खुर्द व सावखेडासीम येथील ग्रामपंचायत सफाई कर्मचार्‍यांचे उपोषण तिसर्‍या दिवशीदेखील कायम होते. उपोषणकर्त्या दोन महिलांची प्रकृती खालावली असुन किनगाव खुर्द पंचायतीकडून चर्चेअंती निर्णय होवू शकला नाही. थकीत पगार अदा करावा, किमान वेतन लागू करावे या मागणीसाठी यावल पंचायत समितीसमोर किनगाव खुर्द व सावखेडासीम येथील प्रत्येकी चार महिला व पुरूष स्वच्छता कामगारांनी शनिवारपासून आमरण उपोषण छेडले आहे.

आठ कर्मचार्‍यांचा उपोषणात सहभाग
किनगाव खुर्दचे विनोद कंडारे, बिर्‍हाम कंडारे, हेमलता कंडारे आदींशी गावातील अनिल त्र्यंबक पाटील यांनी उपोषण मागे घेण्या संदर्भात चर्चा केली मात्र ग्रामपंचायतीकडून सुरुवातीला महिन्याअखेर दोन महिन्यांचा पगार मिळवून देण्याचेे त्यांनी सांगितले मात्र आपण पुर्ण सात महिन्यांचा थकीत पगार मिळाल्याखेरीज उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.

यांची खालावली प्रकृती
सावखेडासीम येथील रमेश हंसकर, मंगूबाई हंसकर, अजय हंसकर व रघु साळवे यांचेदेखील उपोषण कायम आहे तर या उपोषणकर्त्यांपैकी हेमलता कंडारे व मंगूबाई हंसकर या दोघांची प्रकृती खालावली आहे.