स्वच्छता, घरकुलच्या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी दिले सहकार्याचे आश्‍वासन

0

जळगाव । नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या समन्वय समितीच्या सभेत उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणार्‍या स्वच्छ भारत अभियान तसेच घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. शनिवारी 18 रोजी जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांची समन्वय समिती आढावा बैठक पार पडली. शौचालये, घरकुल बांधकामासाठी तलाठी, कोतवाल यांना कामाला लागण्याचे आदेश जिल्हाधिकारी देणार आहे. रेती, विटा आदींचा पुरवठा करण्याची हमी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली आहे. या बैठकीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये बांधकाम, इंदिरा आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, 14 व्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा, ग्रामपंचायत वसुली, ग्रामपंचायत अपहार, प्रगत शाळा बनविणे, रोजगार हमी योजना, पंचायतराज भेटीविषयी सुचना आदी विषयावर आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्यकार्यकार अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, मिनल कुटे आदी उपस्थित होते.

मार्च अखेर 81 हजार शौचालये
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण विकास कामापैकी एक असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करणे हे आहे. जिल्ह्याला मार्च 2018 पर्यत 2 लाख 20 हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून वर्ष 2016-17 मध्ये 1 लाख 50 हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. 81 हजार शौचालय पुर्ण करावयाचे असून त्यापैकी 43 हजार शौचालयाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. 17 हजार शौचालयाचे बांधकाम प्रगती पथावर असून 21 हजार शौचालयाचे बांधकाम बाकी आहे ते मार्च अखेर पुर्ण करावयाचे असल्याने या बैठकीत अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील चारशे गावे हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून अद्यापर्यत 140 गावे हगणदारीमुक्त झाले आहे.