स्वच्छता जनजागृतीत दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग

0

भुसावळ : महाराष्ट्र स्वच्छ अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वच्छताविषयक जनजागृती स्पर्धांमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर यांची उपस्थिती होती. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून म्युनिसिपल हायस्कुल भुसावळ येथे निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धामध्ये शहरातील एकूण 14 शाळा व महाविद्यालय सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी शहर स्वच्छता जनजागृती समितीने परिश्रम घेतले.

विजेत्यांना प्रजासत्ताकदिनी मिळणार पारितोषिक
निबंध स्पर्धेसाठी स्वच्छता अभियानात माझे योगदान, माझी स्वच्छ शाळा, स्वच्छ भारत उद्याचा सुंदर भारत हे विषय होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी शौचालय ज्याचे दारी आरोग्य नांदेल त्याचे घरी, अस्वच्छता एक कलंक, अस्वच्छतेचा भस्मासूर हे विषय तर चित्रकला स्पर्धेसाठी शालेय परिसर श्रमदानातून स्वच्छ करणारे विद्यार्थी, स्वच्छता जनजागृती रॅली, उद्याचे स्वच्छ भुसावळ शहर हे विषय होते. स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. जगदीश पाटील, रमण भोळे, संदीप पाटील, राजश्री सपकाळे, रमण भोळे, आर.डी. शर्मा, पी.डी. पाटील, शेख अय्युब, नितीन अडकमोल, सीमा भारंबे, शेख महंमद इरफान, हमीद शेख यांनी काम पाहिले. स्पर्धेेतील विजेत्यांना येत्या प्रजासत्ताकदिनी 26 रोजी नगरपालिकेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.