स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेवर दोन कोटीची खैरात

0

प्रत्येक प्रभागाला मिळणार सहा लाख

मुंबई : स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढवण्यासाठी देशात स्वच्छतेचे मानांकन मिळवलेल्या मुंबई महापालिकेने यंदाही जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार स्वच्छतेच्या जनजागृतीवर तब्बल दोन कोटींची खैरात करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक प्रभागाला सहा ते आठ लाख रुपयांचे अनुदान देवून स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. मुंबईतील कचर्‍यावर विल्हेवाट लावण्यात येणारी क्षेपणभूमींची क्षमता संपुष्टात आली आहे. कचरा व्यवस्थापन करणे पालिकेसमोर यामुळे मोठे आव्हान बनले आहे. मुंबईत मोठ्या सोसायट्यांना कचरा व्यवस्थापन करणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. तसेच स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अनिवार्य केले आहे. मात्र कचरा व्यवस्थापन न करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो आहे.

मुंबईत सध्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छ मुंबई उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार स्वच्छता सर्वेक्षण 2019 करता महापालिकेने जनजागृतीवर भर दिला आहे. या सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी केंद्रीय कार्यसंघ पुढील आठवड्यात (ता.21) मुंबईत दाखल होणार आहे. कचर्‍याच्या समस्येपासून शौचालयांच्या स्थितीचा यात आढावा घेतला जाणार आहे. तसेच रस्त्यावर पेंटीग, भित्तीचित्र, वाहनांवर स्ट्रीकर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेची धावपळ उडाली आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामांत लोकसहभाग वाढविण्यासाठी
महापालिकेने तब्बल 2 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागाला सहा ते आठ लाख रुपये दिले जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी देखील या मोहिमेत भाग घेतला असून बांद्रा आणि दादरमध्ये सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाचे अधिकारी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात येत आहेत. कचर्‍याच्या समस्येबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी मस्वच्छता एमओयूडीफ हे अ‍ॅप तयार केले आहे. यावरून तक्रार नोंदवल्यास 12 तासांच्या आत समस्येचे निरसन होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.