स्वच्छता हीच ईश्‍वरसेवा

0

पिंपरी : आपणच आपल्या देशात नियम बनवून स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना प्रबोधन करण्यात कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांचे कामाचे तास खर्ची घालत आहोत. तरी त्या विषयात प्रगती होण्याचा वेग समाधानकारक नाही. स्वच्छ परिसर / गाव ही संकल्पना आपल्या संतांनी कित्येक वर्षांपूर्वी सुरु केली. ती महात्मा गांधी यांनी सुद्धा हाताळली. स्वच्छ परिसर, निर्मलग्राम आदी संकल्पना आपल्या संत गाडगे महाराजांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत राबविली. खूपजणांनी त्यांचे अनुकरण करण्यासाठी प्रयत्न केले. गाडगे महाराज नावाने अनेक सामाजिक संस्था जन्माला आल्या पण स्वच्छता ही ईश्‍वर सेवा याचा मात्र आपल्या सर्वांना विसर पडला हे आता पटायला लागले आहे. आज स्वच्छता मोहीम ही फोटोसेशन/चमकोगिरीसाठीचा योग्य उपक्रम ठरला आहे. आज-काल पेडन्यूजचे पेव आल्याने वृत्तपत्रांच्या अधिकृत व अनधिकृत बातमीदारांची चंगळ होत आहे. आपण आपल्या सवयींना जर आवर घातला व आपला कचरा नियंत्रित केला अथवा आपला कचरा स्वतःच जर योग्य ठिकाणी जिरविला तर आपण या मोहिमेतील एक घटक म्हणवून घेण्यालायक ठरणार आहोत.

संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग

आपल्या शहरातील किती सामाजिक संस्था सातत्याने कचरा व्यवस्थापनाबाबत क्रियाशील आहेत याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. प्रत्येक शहरात अथवा खेडे गावात आज प्रत्येक माणसाची मानसिकता बनली आहे की, माझ्या घरातील मी निर्माण केलेला कचरा सरकारी यंत्रणेने माझ्या घरून घेवून जावून त्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेने स्वीकारावी. माझा कचरा आणि व्यवस्थापनाची पुढील जवाबदारी सरकारची असे समीकरण आपण मोडीत काढण्याची वेळ आता आली आहे. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) या संस्थेस आपल्या शहरात पर्यावरणाच्या संवर्धनाच्या अनेक समस्यांवर कृतीशील कार्य करताना खुप चांगले अनुभव आले. नागरिकांकडून भक्कम पाठींबा प्राप्त झाला आहे. अनेक नागरिक एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) या संस्थेत तर असतातच पण त्यांनी त्यांच्या मित्र परिवारात वेगळ्या नावाने अनेक छोट्या संघटना सुरु करून हेच काम सुरु ठेवले आहे. एकंदरीत काय तर पर्यावरणाच्या संवर्धनाच्या कामात आपल्या शहरातील असंख्य नागरिक कार्यरत आहेत. त्यात कौतुकाची बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक म्हणून लाभलेले सर्व सनदी अधिकारी हे पर्यावरण संवर्धनाबाबत अतिशय जागृत व सकारात्मक मानसिकतेचे होत व आहेत.

सामाजिक प्रबोधन हेच ध्येय

इसिए संस्थेचे मुख्य ध्येय सामाजिक प्रबोधन व जनजागृती असल्याने लोकशिक्षण आणि शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याची संधी कधीच गमावली नाही. उदा. घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, कचरा हाताळणीमध्ये नागरिकांचा सहभाग व पुढाकार , प्लास्टिक कॅरी बॅग वापर बंदी, उघड्यावर हगणदारी, साथीच्या आजारांच्या काळात घ्यावयाची काळजी, धुम्रपान बंदी, इ-वेस्ट संकलन, नदी स्वच्छता, वृक्ष लागवड व संगोपन, वाहतुकी नियम पालन, सार्वजनिक शौचालय गरज व निगा, सार्वजनिक वाहतूक आवश्यकता, पादचारी मार्गाचा वापर, मतदानाचा हक्क बजावणी, पाणी बचाव, हवा प्रदूषण नियंत्रण, नदी प्रदूषण व जलसाठे प्रदूषण नियंत्रण, व्यसन मुक्ती आदी. धार्मिक सणांच्या काळात नागरिकांच्या वागण्यातील बेशिस्त वर्तनामुळे होणारा पर्यावरण र्‍हास नियंत्रण व त्याबाबत प्रबोधन आदी विषयांवर 365 दिवस काम करण्यासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) या संस्थेस प्रशासन सोबत घेत आहे आणि नागरिकसुद्धा विना मोबदला कार्य करीत असतात. आपल्या शहरात कायम स्वरूपी पर्यावरण संस्कार केंद्र सुरु करण्याबाबत इसिए मागील चार वर्ष पाठपुरावा करून त्यात यश प्राप्त केले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी या संकल्पनेस हिरवा कंदील दाखविला आहे. त्याचे प्रशासकीय मान्यतेचे व आर्थिक नियोजनाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे शहरतील प्रत्येक नागरिकास ह्या पर्यावरण संस्कार केंद्राचा लाभ होणार आहे. झोपडपट्टीत राहणारे विद्यार्थी ते बंगल्यात राहणार्‍या श्रीमंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकते नुसार ज्ञान व बौद्धिक करमणूक लाभ प्राप्त होणार आहे. जेष्ठ नागरिक व गृहिणी यांना रोज वेगवेगळी माहिती प्राप्त होणार आहे.

शहराला नवीन ओळख प्राप्त

शहरातील व सभोवतालच्या गावातील शाळा आपल्या शहरात येवून पर्यावरण संवधान विषयक आधुनिक ज्ञान प्राप्त करू शकतील या उपक्रमामुळे आपल्या शहराला नवीन ओळख प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या सहकार्याने इसिए हा उपक्रम राबविणार आहे. पिंपरी-चिंचवड मनपा पर्यावरण कक्ष यांच्या नियंत्रण मर्यादेत इसिए तेथे उपक्रम राबविणार आणि त्यासाठी आपल्या संपूर्ण शहरातील स्वयंसेवक व विद्वान मंडळीस ज्ञानदान सेवेचा लाभ उपलब्ध होणार आहे. शहराला भेडसावत असलेला इ वेस्ट व्यवस्थापनाचा प्रश्‍न नजदिकच्या काळात सुटणार आहे. इसिएने मागील पाच वर्ष सातत्याने महानगरपालिकेचा पाठपुरावा करून विषय मार्गी लावला आहे. मनपाच्या मालकीचे इ वेस्ट संकलन उद्योग सुरु होत आहे. त्यासाठी प्रशस्त जागा व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या आहेत. आयुक्त हर्डीकर यांनी याबाबत अनेकवेळा इसिएसोबत चर्चा केली आहे. आपण आपल्या शहरात हा उपक्रम राबवून आपल्या देशात एक आदर्श घालून देणार आहोत.
इसिए स्वप्न दाखवीत नाही तर प्रत्यक्ष कृतीही करीत असते. सर्वांनी शहर स्वच्छतेमध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या समवेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव, फटाके विरहीत दिवाळी, गुलाल विरहीत मिरवणुका, प्लास्टिक बंदी आदी विषयात जनजागृती केली आणि त्याचे समाधानकारक निकाल अनुभवीत आहोत.

दैनिक जनशक्तीमधून मिळते प्रसिद्धी

मागील 500 दिवस शहरातील लोकप्रिय दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रातून रोज विद्यार्थ्यांनी रंगविलेली पर्यावरणपूरक चार चित्रे प्रसिद्ध होत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रोत्साहन देत आहोत. यासाठी इसिए विश्‍वस्त आणि दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक कुंदन ढाके यांनी पुढाकार व सहयोग दिले आहे. आमच्या मुलांची चित्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई आवृत्तीमध्ये प्रसिद्ध होतात. विशेष म्हणजे आपल्या चित्रांची दखल मुंबई मंत्रालयातील सर्व कार्यालयातून घेतली जात आहे. आज पिंपरी-चिंचवडमधील इसिएची पर्यावरण संवर्धनाचीची प्रत्येक बातमी जनशक्ती वृृत्तपत्र प्रसिद्ध करीत आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. शहरात प्रचंड गतीने विकास घडत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या समस्या रोज नव्याने आपल्या समोर उभ्या राहणार आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही बाबतीत अतिरेक व आकस न बाळगता पिंपरी-चिंचवड महापालिकेस सहकार्य व गरज भासल्यास सुचना करून त्यांच्या सोबत राहून समस्या निर्सानात सहभागी होणे गरजेचे आहे. सध्या शहरामध्ये वृक्षप्रेम अचानक उफाळून आले आहे. वृक्षप्रेम व्यक्त करताना प्रथम आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आणि सामजिक पोलीस म्हणून काम करणे गरजेचे आहे. नागरी विकास होताना काही ठिकाणी वृक्ष तोड होणे अपेक्षित आहे. जसे मेट्रोसाठी काही झाडे स्थलांतरित करावी लागली. पण त्यासाठी सामाजिक संघटनाचे अस्तित्व दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरणे योग्य वाटत नाही. अशा मंडळीची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपण सर्वजण पिंपरी-चिंचवड महापालिकेसोबत आहात या मध्येच यातूनच आपले पर्यावरण प्रेम व्यक्त होत आहे.

शाळा सुविधा बघणारे महापौर

कोलमडलेली अथवा अस्तित्वात नसलेली सार्वजनिक वाहतूक, घन कचरा व्यवस्थापनात राजकीय मानसिकता व लोक सहभाग यांचा अभाव, जनतेसमोर शहर विकासाचे संकल्प वास्तव चित्र उपलब्ध नसणे, शहरातील मनपा मालकीच्या मिळकती व वस्तूंची बेदाद, मनपा शिक्षण योजनेमध्ये पारदर्शी व गतीशिल बदलांचा अभाव, मनपा उद्यान विभागात तज्ञांचा अभाव, कचरा वर्गीकरण बाबत तळा गाळातील नागरिकांना प्रबोधन व पर्यायी पर्याय बाबत लोकशिक्षण, रेन वाटर हार्वेस्टिंग बाबत राजकीय संवेदनहीन धोरणे आदी खर्‍या समस्या आहेत. शहरात समस्या जरी असल्या तरी आपले मनपा प्रशासन प्रयत्नशील आहे हि जमेची बाजू विसरून चालणार नाही. याचे सर्व श्रेय इसिए आयुक्त हर्डीकर यांच्या चाणाक्ष कार्यपद्धतीला जाते. या ठिकाणी खास उल्लेख करण्यासारखे विद्यमान महापौर राहुल जाधव आहेत. कारण शहरातील मनपा शाळा भेट करून शाळा सुविधा तपासणी करणारे हे एकमेव महापौर आहेत. अशा मानसिकतेच्या महापौर व्यक्तीस सलाम करतो.